( मुंबई )
राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई विद्यापीठाने आज (२० ऑगस्ट २०२५) रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. यासंदर्भात परीक्षांच्या नवीन तारखा लवकरच विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.mu.ac.in जाहीर केल्या जातील, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक पूजा रौंदळे यांनी दिली. यापूर्वी १९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या परीक्षा देखील खराब हवामानामुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्या सर्व परीक्षा आता २३ ऑगस्ट २०२५ रोजी घेतल्या जाणार आहेत, असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
विद्यापीठाचे परिपत्रक आणि सूचना
मुंबई विद्यापीठाने आपल्या अंतर्गत येणारे ठाणे, रत्नागिरी व कल्याण उपकेंद्र, तसेच सर्व संलग्न महाविद्यालयांचे प्राचार्य व विभागप्रमुखांना उद्देशून एक परिपत्रक जारी केले आहे. त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे की, “२० ऑगस्ट २०२५ रोजीच्या सर्व परीक्षा (Summer 2025 आणि Winter 2025) अतिवृष्टीमुळे पुढे ढकलण्यात येत आहेत.” विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांना आणि संबंधित कर्मचाऱ्यांना ही महत्त्वाची माहिती तातडीने पोहोचवण्याचे आवाहन केले आहे.
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे निर्देश
-
१९ ऑगस्टच्या परीक्षा आता २३ ऑगस्ट रोजी होणार.
-
२० ऑगस्टच्या नवीन तारखा लवकरच घोषित केल्या जातील.
-
अधिकृत माहिती साठी www.mu.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
मुंबईतील मुसळधार पावसामुळे परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले असून, सलग दुसऱ्या दिवशी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी नवीन तारखांसाठी विद्यापीठाच्या वेबसाईटवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

