(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी शहरात भीमा कोरेगाव विजयदिन आणि थिबा राजा जयंतीचे आयोजन करण्यात आले असून, हा संयुक्त कार्यक्रम थिबा राजा कालीन बुद्धविहार बचाव संघर्ष समिती (ता. जि. रत्नागिरी) यांच्या वतीने १ जानेवारी २०२६ रोजी साजरा केला जाणार आहे. सामाजिक समतेचा, स्वाभिमानाचा आणि ऐतिहासिक लढ्याचा वारसा जपणाऱ्या या दिनाचे औचित्य साधून विविध अभिवादनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.३० वाजता शिवाजीनगर, रत्नागिरी येथील थिबा राजा यांच्या समाधीस्थळी पुष्प अर्पणाने होणार आहे. त्यानंतर सकाळी ११.०० वाजता डी. एस. पी. बंगल्याशेजारी असलेल्या थिबा राजा कालीन बुद्धविहारात बुद्धवंदना घेतली जाणार आहे. पुढे सकाळी ११.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भीमा कोरेगाव विजयस्तंभाच्या प्रतीकृतीस अभिवादन करण्यात येणार असून, त्याचवेळी बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कृतज्ञता व्यक्त केली जाणार आहे. या कार्यक्रमांचा समारोप दुपारी १२.०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन (सिव्हिल हॉस्पिटल शेजारी) येथे आयोजित अभिवादन सभेने होणार आहे.
हा कार्यक्रम केवळ एका समाजापुरता मर्यादित नसून, सर्व भारतीयांचा व सर्व नागरिकांचा असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे. सामाजिक सलोखा, बंधुता आणि ऐतिहासिक स्मृती जपण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन थिबा राजा कालीन बुद्धविहार बचाव संघर्ष समिती, रत्नागिरी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

