(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडून सध्या सात कर्मचाऱ्यांविरोधात विभागीय आणि खातेनिहाय चौकशा सुरू आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना मारहाण करणारे शिक्षक, प्रशासनाविरोधात आक्षेपार्ह लिखाण करणारे शिक्षक तसेच अनियमित कारभार करणाऱ्या ग्रामसेवकाचा समावेश आहे. विशेष म्हणजे, काही शिक्षकांविरोधात ही दुसरी चौकशी असून, त्यांचे वर्तन पुन्हा तपासणीच्या कक्षेत आले आहे.
जिल्हा परिषदेच्या विविध विभागांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी सामान्य प्रशासन विभागाची असते. कोणत्याही कर्मचाऱ्याविरोधात तक्रार प्राप्त होताच संबंधित अधिकाऱ्यांकडून चौकशीचा आदेश दिला जातो. सध्या सुरू असलेल्या चौकशांमध्ये शिक्षण विभागातील चार शिक्षक, दोन ग्रामसेवक आणि एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे.
चारपैकी काही शिक्षकांवर विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचे गंभीर आरोप असून, त्यांच्या चौकशीला गती मिळाली आहे. एका निलंबित शिक्षकावर प्रशासनाविरोधात आक्षेपार्ह लेखन केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून, त्याच्यावर पुन्हा खातेनिहाय चौकशी सुरू आहे. लांजा तालुक्यातील एका ग्रामसेवकाविरोधात कारभारातील अनियमिततेमुळे चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. उर्वरित दोन शिक्षकांविरोधातही विभागीय चौकशी सुरू असून, शालेय शिस्तभंगाशी संबंधित तक्रारींचीही तपासणी केली जात आहे.
या सातही प्रकरणांमुळे जिल्हा परिषदेच्या कारभारात पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात असल्याचे स्पष्ट होते. अशा चौकशांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये शिस्तभंगाला चाप बसू शकतो, असा प्रशासनाचा विश्वास आहे. यापुढे तक्रारींच्या अनुषंगाने कठोर कारवाईचा इशाराही दिला जात आहे. दरम्यान, या चौकशांचे निष्कर्ष काय लागतात आणि संबंधित कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई होते, याकडे जिल्हा प्रशासनासह सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागून आहे.