( देवरुख / प्रतिनिधी )
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्यातर्फे आयोजित शिक्षक–अधिकारी–पर्यवेक्षकांसाठीच्या “समजपूर्वक वाचन” या स्पर्धेत देव धामापूर–सप्रेवाडी येथील कर्तव्यनिष्ठ, अभ्यासू व बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले सतीश आनंदा वाकसे यांनी विभागीय स्तरावर चतुर्थ क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
देव-धामापूर सप्रेवाडी तालुका संगमेश्वर येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले श्री वाकसे हे केवळ शिक्षक नसून एक संवेदनशील मार्गदर्शक, इतिहासाचे अभ्यासक आणि उत्कृष्ट वाचक आहेत. त्यांचा वाचनाचा व्यासंग अफाट असून विविध प्रशिक्षण कार्यक्रमांमधून त्यांनी शिक्षकांना समजपूर्वक वाचन, अध्ययन-अध्यापन पद्धती व मूल्याधिष्ठित शिक्षणाबाबत प्रभावी मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी व्याख्यानांनी अनेक शिक्षकांना नवी दिशा दिली आहे.
विशेष म्हणजे, आपल्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी जर्मन भाषा शिक्षणाचा उपक्रम यशस्वीपणे राबवून त्यांनी नावीन्यपूर्ण प्रयोगशीलतेचा आदर्श निर्माण केला आहे. सातत्यपूर्ण अभ्यास, नवनवीन उपक्रम, वाचन संस्कृतीचा प्रसार आणि विद्यार्थीकेंद्रित दृष्टिकोन यामुळे श्री वाकसे हे आजच्या शिक्षकांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत. समजपूर्वक वाचन या स्पर्धेसाठी त्यांची राज्यस्तरावर निवड होणे ही त्यांच्या मेहनतीची, अभ्यासू वृत्तीची आणि गुणवत्तेची पावती आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

