( नवी मुंबई )
आई आणि मुलीचं नातं सर्वात पवित्र मानलं जातं. मात्र नवी मुंबईतील कळंबोली येथे घडलेल्या घटनेनं या नात्यालाच काळा डाग लावला आहे. केवळ मराठी बोलता येत नाही, या कारणावरून सहा वर्षांच्या निष्पाप मुलीची हत्या करण्यात आली. या प्रकरणात अन्य कोणी नाही, तर आईच आपल्या मुलीच्या मृत्यूची कारणीभूत ठरल्याचं तपासात उघड झालं आहे.
ही धक्कादायक घटना कळंबोली सेक्टर 1 मधील गुरुसंकल्प हाऊसिंग सोसायटीत घडली. येथे राहणाऱ्या एका आयटी इंजिनिअरच्या सहा वर्षांच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला होता. या सोसायटीत आयटी इंजिनिअर तरुण आपल्या बीएससी शिक्षण घेतलेल्या ३० वर्षांच्या पत्नीसोबत राहतो. विशेष म्हणजे त्यांच्या सहा वर्षांच्या मुलीला लहानपणापासून बोलण्यात अडचण जाणवत होती. ती मराठीऐवजी हिंदी भाषेचे शब्द जास्त वापरायची. तिच्या बोलण्यात अधिकांश हिंदी भाषा असायची. मुलीच्या आईला हे आवडत नव्हतं. मुलीच्या आरोग्याच्या अडचणीमुळे तिची आई मानसिक तणावात होती. अनेकदा तिने पतीला अशी मुलगी नको असल्याचं म्हटलं होतं. पती तिला समजावण्याचा प्रयत्न करीत होता, अशीही माहिती समोर आली आहे. सुरुवातीला कुटुंबीयांनी मुलीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा दावा केला. मात्र पोलिसांना या प्रकरणात संशय वाटल्याने तपासाची दिशा बदलली.
कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कोटे यांनी विशेष शवविच्छेदन करण्याचे आदेश दिले. शवविच्छेदन अहवालात मुलीचा मृत्यू श्वसनमार्ग बंद झाल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पालकांची कसून चौकशी करण्यात आली. जवळपास सहा तासांच्या चौकशीनंतर आईने अखेर गळा दाबून हत्या केल्याची कबुली दिली.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मुलीला लहानपणापासून बोलण्यात अडचण होती. ती प्रामुख्याने हिंदीत बोलत असे. यावरून आईला सतत चिडचिड होत होती. तिने पतीकडे अनेकदा नाराजी व्यक्त करत, “मला असं मूल नको आहे, ती नीट बोलत नाही,” असे विधान केल्याचंही समोर आलं आहे. हाच राग आणि असहिष्णुता पुढे भयंकर गुन्ह्यात बदलली.
हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
23 डिसेंबरच्या रात्री आईने मुलीला ठार मारण्याचा निर्णय घेतला. त्या दिवशी मुलीची आजी घरी आली होती, मात्र काही कारणामुळे त्यांची भेट झाली नाही. रात्री वडील घरी परतल्यानंतर मुलगी उठत नसल्याचे लक्षात आले. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले.
तपासात आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. आरोपी महिलेला मानसिक आरोग्याच्या समस्यांमुळे मानसोपचारतज्ज्ञांकडून उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाही मुलीच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत, याचाही पोलीस तपास करत आहेत.
हे प्रकरण केवळ एक हत्या नसून मानसिक आरोग्य, कौटुंबिक ताणतणाव आणि मुलांवर भाषा किंवा अपेक्षांचे ओझे लादण्याचे किती गंभीर परिणाम होऊ शकतात, याचा धोकादायक इशारा आहे. पोलिसांनी आरोपी आईला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

