देशभरात गाजलेल्या सैराट चित्रपटाने ऑनर किलिंगचं भीषण वास्तव मांडलं होतं. त्याच पद्धतीने आता जळगाव देखील प्रेमविवाह केलेल्या जोडप्यावर मुलीच्या बापाने चक्क गोळ्या झाडल्या आहेत. यात या मुलीचा मृत्यू झालाय तर तिचा नवरा गंभीर जखमी आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहर या ऑनर किलिंगच्या घटनेने हादरले आहे. प्रेमविवाह केल्याच्या रागातून एका निवृत्त सीआरपीएफ अधिका-याने लग्नसोहळ्यातील हळदीच्या कार्यक्रमात घुसून आपल्या मुलीवर गोळीबार केला आहे.
तृप्ती वाघ या चार महिन्यांच्या गर्भवती होत्या, अविनाश वाघ आणि तृप्ती यांनी आंतरजातीय प्रेमविवाह केल्याचा राग मुलीच्या बापाच्या मनात खदखदत होता. मुलीने चारचौघात अब्रु घालविली ह राग वडिलांच्या डोक्यात होता. चोपडा शहरातील आंबेडकर नगरामध्ये हळदीच्या कार्यक्रमात ही गोळीबाराची भयानक घटना घडली. तृप्तीचे वडील किरण अर्जुन मांगले हे सीआरपीएफचे निवृत्त अधिकारी आहेत. त्यांनी त्यांच्या परवाना असलेल्या बंदुकीचा वापर करून हा गोळीबार केल्याची माहिती आहे.
या घटनेत तृप्ती वाघ (२४) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तिचा पती अविनाश वाघ (२८) याच्या पाठीत गोळी घुसली आहे. तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर जळगावच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना जळगाव मधील चोपडा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिसरात घडली. तृप्ती किरण मंगले या 24 वर्षीय मुलीने अविनाश वाघ 28 वर्षीय तरुणाने दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. हा विवाह तिच्या कुटुंबीयांना मान्य नव्हता. मात्र अविनाश वर जीवापाड प्रेम करणाऱ्या तृप्तीने आपलं प्रेम तडीस न्यायचं ठरवलं. आणि या दोघांनीही गुपचूप प्रेमविवाह केला.
त्यानंतर हे दोघेही पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये वास्तव्यास आले. दरम्यान अविनाशच्या बहिणीचे लग्न असल्याने हे दोघे जळगावला आले होते. यावेळी बहिणीच्या हळदीसाठी आपली लेक आणि जावई त्या ठिकाणी आल्याची माहिती सासऱ्याला मिळाली. त्यामुळे मनाविरुद्ध केलेल्या प्रेमविवाहाचा बदला घेण्यासाठी निवृत्त सीआरपीएफ अधिकारी असलेल्या सासऱ्याने थेट विवाहास्थळ गाठलं. त्या ठिकाणी त्या नवरी मुलीची हळद सुरू होती. तृप्ती यांचे वडिल किरण मांगले त्याठिकाणी आले त्यावेळी मुलीला आणि जावयाला नाचताना पाहून त्यांचे डोके भणभणले आणि त्यांनी जवळून या दाम्पत्यावर गोळीबार केला. भर मांडवात आरोपी किरण मंगले यांनी आपल्या मुलीवर आणि जावयावर बेछूट गोळीबार केला. या घटनेत मुलगी तृप्तीचा मृत्यू झाला. तर जावई अविनाश याला पाठीत व हाताला गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.
जळगाव मधील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असून हे गोळीबार झाल्यानंतर नातेवाईकांनी आरोपी किरण मंगले याला देखील बेदम मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेही यांनी घटनास्थळी जाऊन संपूर्ण माहिती घेतली. या प्रकरणात आता गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकलंय.