(चिपळूण)
चिपळूण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडाई (CREDAI) चिपळूण संस्थेच्या वतीने नवनिर्वाचित नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांची आज (शनिवारी) त्यांच्या माऊली संपर्क कार्यालयात सदिच्छा भेट घेण्यात आली. यावेळी क्रीडाईकडून नगराध्यक्षांचा सत्कार करण्यात आला तसेच शहर विकासाशी संबंधित विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली.
चिपळूण शहराच्या विकासाला अडथळा ठरणारे प्रश्न, तसेच महापुराच्या पार्श्वभूमीवर चिपळूण आणि राजापूरला शासनस्तरीय समितीत प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी नगराध्यक्षांनी विशेष प्रयत्न करावेत, अशी मागणी क्रीडाईच्या वतीने करण्यात आली. शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी क्रीडाई चिपळूणचे सहकार्य कायम राहील, अशी ग्वाहीही यावेळी देण्यात आली.
यावर प्रतिक्रिया देताना नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी रेड लाईन–ब्ल्यू लाईनचा प्रश्न, चिपळूण शहरातील गाळमुक्ती आणि वारंवार भेडसावणारा पूरप्रश्न या महत्त्वाच्या विषयांवर प्राधान्याने काम करण्यात येईल, असे स्पष्ट केले. तसेच क्रीडाई चिपळूणच्या वतीने पाच सदस्यांचे शिष्टमंडळ तयार करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यात येणार असून, पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून शहर विकासाशी संबंधित प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातील, असेही त्यांनी सांगितले.
या भेटीवेळी क्रीडाई चिपळूणचे अध्यक्ष शकील चौगुले, सदस्य व नगरसेवक उदय जुवळे, राजेश वाजे, जावेद दलवाई, माजी अध्यक्ष संतोष तडसरे, शकील मुकादम, प्रकाश देसाई, बळीराम मोरे, प्रीतम पटेल, मनोज भोजने, मारुती मोरे, साहिल खळे, मयूर देसाई तसेच नगरसेवक अंकुश आवले आदी मान्यवर उपस्थित होते.

