(मुंबई / वृत्तसंस्था)
शिवसेनेचा सुवर्ण महोत्सवी दसरा मेळावा मंगळवारी (२० ऑक्टोबर) मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर पार पडला. या मेळाव्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकार, भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या गटावर जोरदार हल्लाबोल केला. देशातील १३ कोटी मतदारांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतल्याचा आरोप करत त्यांनी सत्ताधाऱ्यांना बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचे थेट आव्हान दिले. देशातील लोकशाही आणि नागरिकांचे हक्क वाचवण्यासाठी सत्ता बदलाच्या भूमिकेतून मैदानात उतरल्याचे स्पष्ट करत त्यांनी तरुणांच्या आंदोलनांना पाठिंबा दिला. आंदोलकांना नक्षलवादी किंवा गुन्हेगार ठरवून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
दसऱ्याच्या दिवशी सोने लुटण्याची आणि खरेदी करण्याची आपली जुनी परंपरा आहे. सोने हे शुभ भावना आणि मंगलतेचे प्रतीक मानले जाते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी सोने खरेदी करू नका, असे सांगतात. आज देशात सोने लुटणे तर दूरच, उलट संपूर्ण लोकशाहीच लुटली जात आहे. जनतेची मते चोरली जात आहेत. आता जनतेचे काय लुटायचे बाकी ठेवले आहे?
सत्ताधाऱ्यांनी सर्व यंत्रणांवर ताबा मिळवल्यानंतर सामान्य जनतेसाठी न्याय मागण्याचे मार्गही बंद झाल्याची परिस्थिती आहे. न्यायालय, पोलीस, नोकरशाही आणि मुख्यमंत्र्यांचे दरवाजे ठोठावूनही न्याय मिळत नसेल, तर सामान्य नागरिकाने दाद मागायची तरी कुणाकडे? सर्व मार्गांनी प्रयत्न करूनही न्याय मिळत नसल्याने एखादा नागरिक संतापून आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरतो, तेव्हा त्याचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी सरकार त्याला थेट ‘नक्षलवादी’ किंवा ‘गुंड’ ठरवून मोकळे होते.
गेल्या १२ वर्षांतील केंद्र सरकारच्या कारभारावर टीका करताना ठाकरे म्हणाले की, सरकारच्या मनमानीला कंटाळून तरुण आणि विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. मोदी-शहांची दहशत आणि पोलिसांच्या दडपशाहीला तरुण घाबरत नसल्याचा दावा त्यांनी केला. निवडणूक आयोगाच्या मदतीने लोकशाहीचे अपहरण करण्यात आल्याचा आरोप करत मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवल्याच्या कथित प्रकाराविरोधात तरुणाईचा असंतोष वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. “होय, आम्ही सत्ता बदलण्यासाठीच उभे आहोत,” असे ठामपणे सांगत त्यांनी सत्ताधाऱ्यांना बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचे आव्हान दिले.
तरुणांच्या आंदोलनामागे केवळ राजकीय हेतू नसून अनेक वर्षांपासून साचलेला असंतोष असल्याचे ठाकरे यांनी नमूद केले. नोटबंदीमुळे व्यवसाय उद्ध्वस्त झाल्याचे एका आंदोलकाने सांगितल्याचा अनुभव त्यांनी सभेत मांडला. रोजगार, आर्थिक अडचणी आणि सरकारी यंत्रणांकडून न्याय मिळत नसल्याची भावना या प्रश्नांमुळे तरुणांमध्ये संताप निर्माण झाल्याचे ते म्हणाले. नीट परीक्षेचा पेपर फुटल्याच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या तरुणांच्या मागण्यांचाही त्यांनी उल्लेख केला. जंतरमंतरवरील आंदोलनादरम्यान तरुण-तरुणींवर लाठीमार आणि मारहाण झाल्याचा संदर्भ देत त्यांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले.
रस्त्यावर उतरलेल्या तरुणांना नक्षलवादी ठरवण्याच्या भूमिकेवर टीका करताना ठाकरे म्हणाले की, प्रश्न मांडूनही न्याय मिळत नसेल, तर आंदोलन करणाऱ्यांना गुन्हेगार ठरवणे चुकीचे आहे. “हे तरुण रस्त्यावर उतरत आहेत ते नक्षलवादी नाहीत, तर क्रांतिकारी आहेत,” असे ते म्हणाले. दिल्लीतील आंदोलनादरम्यान पोलिसांनी तरुणांवर केलेल्या कारवाईचा उल्लेख करत त्यांनी मुलांना गुराढोरांसारखे मारल्याचा आरोप केला. आंदोलकांना समजून घेतले नाही, तर परिस्थिती गंभीर होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला. पोलिसांनी कायद्याचे रक्षक म्हणून काम करावे, सत्ताधाऱ्यांचे हत्यार बनू नये, असे सांगत अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांना दडपण्याचे राजकारण थांबवण्याची मागणी त्यांनी केली.
सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना राजकीय पक्ष म्हणून सर्वप्रथम आपणच पाठिंबा दिला होता आणि तो आजही कायम असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. तरुणांच्या आंदोलनांना पाठिंबा व्यक्त करताना त्यांनी “आगे बढो, हम तुम्हारे साथ है,” असे म्हटले. जेन झीच्या तिरंगा आंदोलनाचा संदर्भ देत त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख डॉ. मोहन भागवत यांनाही सवाल केला.
महाराष्ट्राला शहरी नक्षलवादाचे केंद्र संबोधण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेवरही ठाकरे यांनी तीव्र आक्षेप घेतला. सरकारने न्यायालयात महाराष्ट्र हे शहरी नक्षलवाद्यांचे केंद्र असल्याचा दावा केल्याचा संदर्भ देत, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिकारक, संत, समाजसुधारक, साहित्यिक आणि विचारवंतांची परंपरा असलेल्या राज्याला अशा प्रकारे बदनाम करण्याची हिंमत होतेच कशी, असा सवाल त्यांनी केला. महाराष्ट्राने देशाला नेतृत्व दिले, सामाजिक क्रांतीची दिशा दाखवली आणि स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाचे योगदान दिले, असे सांगत राज्यावर नक्षलवादाचा शिक्का मारणे हा महाराष्ट्राचा अपमान असल्याची भूमिका त्यांनी मांडली.
ठाकरे यांनी आपल्या भाषणात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरूनही भाजपला लक्ष्य केले. “आमचे हिंदुत्व हे देशभक्तीचे आहे,” असे सांगत धर्माच्या नावावर सुरू असलेल्या राजकारणावर त्यांनी टीका केली. “हातात नाही काम, बोल जय श्रीराम हे आमचे हिंदुत्व नाही. हृदयात राम आणि हाताला काम हे आमचे हिंदुत्व आहे,” असे ते म्हणाले. आपण कट्टर देशाभिमानी हिंदू असल्याचे स्पष्ट करतानाच देशभक्त मुसलमानांचा रंग हिरवा आणि देशभक्त बौद्धांचा रंग निळा असल्याचे त्यांनी नमूद केले. भाजप तिरंग्यातील रंग वेगवेगळे करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या महाराष्ट्र बहुभाषिक राज्य असल्याच्या विधानाचाही ठाकरे यांनी समाचार घेतला. महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य असल्याचे सांगत त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून दिली. मुंबई मिळवण्यासाठी गुजरातने पराकाष्ठा केली, मात्र मराठी माणसाने रक्त सांडून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळवला, असे ते म्हणाले. शिवसेना संपवल्यानंतर मुंबईवर ताबा मिळवता येईल, असा सत्ताधाऱ्यांचा समज असल्याचा आरोप करत त्यांनी इशारा दिला की, मुंबई गिळण्याचा प्रयत्न झाला, तर मराठी माणूस त्याला प्रत्युत्तर दिल्याशिवाय राहणार नाही.
भाजपच्या गेल्या १२ वर्षांतील कारभारावर टीका करताना ठाकरे यांनी पक्षावर ‘संभ्रम घोटाळा’ केल्याचा आरोप केला. अशक्यप्राय स्वप्ने दाखवून मते मिळवणे, विरोधकांविरोधात खोटी मोहीम चालवणे, बदनामी करणे आणि भ्रष्टाचाराचे आरोप करणे, अशी भाजपची कार्यपद्धती असल्याचे ते म्हणाले. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्याविरोधातही अशीच मोहीम राबवण्यात आली होती; मात्र नंतर त्यांची आरोपांतून निर्दोष मुक्तता झाली, असे ठाकरे यांनी नमूद केले.
शेतकऱ्यांच्या मदतीच्या मुद्द्यावरूनही त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला. “गद्दारांना पन्नास खोके, शेतकऱ्यांना पाच हजार!” अशा शब्दांत त्यांनी टीका केली. शेतकऱ्यांना दिली जाणारी ५ हजार रुपयांची मदत पुरेशी नसल्याचे सांगत नमो किसान योजनेचे ४ हजार रुपये अद्याप मिळणे बाकी असल्याचा दावा त्यांनी केला. कर्जमाफी जाहीर करण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात किती शेतकऱ्यांना तिचा लाभ मिळाला, याची माहिती नसल्याचे ते म्हणाले. केंद्राचे पथक पाहणी करून गेले, मात्र नेमकी मदत किती आणि कोणाला मिळणार, हे अद्याप स्पष्ट नसल्याचा आरोप त्यांनी केला. शाळेच्या सहलीसाठी पैसे नसल्यामुळे १४ वर्षांच्या युवराज या शेतकऱ्याच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचेही ठाकरे यांनी भाषणात सांगितले.
राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करताना त्यांनी अभिनेता टायगर श्रॉफवरील हल्ल्याचा उल्लेख केला. हल्ल्यानंतर पोलिसांनी आरोपींना पकडले, याचे कौतुक करण्यापेक्षा असा हल्ला होऊच कसा दिला, याचे उत्तर सरकारने द्यावे, असे ते म्हणाले. “सुदैव त्या पोराचं म्हणून तो पोरगा वाचला. पण गोळी जर वर्मी लागली असती आणि मग पोलिसांनी हे गुंड पकडले असते, तर उपयोग काय?” असा सवाल त्यांनी केला. नवरात्रोत्सवात नाकाबंदी सुरू असतानाही शस्त्र घेऊन आलेले आरोपी पोलिसांच्या नजरेतून कसे सुटले, अशी विचारणाही त्यांनी केली. देवेंद्र फडणवीस यांनी बिश्नोईला साबरमती तुरुंगातून महाराष्ट्रात आणून दाखवावे, असे आव्हानही ठाकरे यांनी दिले.
मतचोरीच्या मुद्द्यावरून निवडणूक यंत्रणेवर टीका करताना ठाकरे यांनी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मतदानाचा अधिकार हिरावला जात असल्याची भावना निर्माण झाली, तर नागरिकांनी आवाज उठवायचा नाही का, असा सवाल त्यांनी केला. अन्यायाविरुद्ध संताप व्यक्त न करणाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊ नये, असेही ते म्हणाले.
दसरा मेळाव्यातील भाषणातून उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकार, भाजप आणि शिंदे गटावर विविध मुद्द्यांवरून निशाणा साधला. मतदानाचा अधिकार, तरुणांच्या आंदोलनांवरील पोलिसी कारवाई, हिंदुत्व, महाराष्ट्राची अस्मिता आणि शेतकऱ्यांच्या मदतीच्या प्रश्नांवरून त्यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. लोकशाही आणि नागरिकांचे हक्क वाचवण्यासाठी राजकारणात बदल घडवून आणण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी सत्ता बदलाच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला.


