(मुंबई / वृत्तसंस्था)
व्हिडिओ कॉलचे चित्रीकरण प्रसारित करून बदनामी करण्याची धमकी देत घाटकोपरमधील ६१ वर्षीय व्यक्तीकडून सुमारे चार कोटी रुपये उकळल्याचा आरोप असलेल्या नाझिया मेहमूद शेख ऊर्फ नाझनीन या महिलेला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. घाटकोपर पश्चिम येथील एल. बी. एस. मार्गावरील राधाकृष्ण हॉटेलजवळ १८ ऑक्टोबर रोजी दुपारी १.३० वाजता पाच लाख रुपये स्वीकारण्यासाठी आलेल्या नाझियाला पोलिसांनी सापळा रचून पकडले. या प्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, कथित खंडणीचे व्यवहार आणि या प्रकरणातील अन्य संभाव्य सहभागींविषयी तपास सुरू आहे.
या प्रकरणातील तक्रारदार घाटकोपर पूर्वेतील पंतनगर परिसरात राहतात. ते कुर्ला पश्चिम येथील आपल्या नातेवाइकांच्या सराफा पेढीत व्यवस्थापक म्हणून काम करीत होते. २०२० मध्ये दागिने खरेदी करण्यासाठी दुकानात आलेल्या नाझियाशी त्यांची ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये मोबाइलवरून संपर्क सुरू झाला. आर्थिक अडचणी असल्याचे सांगून नाझियाने मार्च ते डिसेंबर २०२४ या कालावधीत टप्प्याटप्प्याने सुमारे दहा लाख रुपये उसने घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
डिसेंबर २०२४ ते जानेवारी २०२५ दरम्यान नाझियाने तक्रारदारांना व्हॉट्सॲपवर व्हिडिओ कॉल केले. या संभाषणादरम्यान ती पूर्ण विवस्त्र अवस्थेत दिसत होती. या कॉलचे चित्रीकरण आपल्याकडे असल्याचा दावा करून ते इंटरनेटवर प्रसारित करण्याची धमकी नाझियाने दिल्याचा आरोप आहे. चित्रीकरण सार्वजनिक होऊ नये, यासाठी तिने पाच लाख रुपयांची मागणी केली. बदनामी होण्याच्या भीतीने तक्रारदारांनी तिला पैसे दिले.
तक्रारीनुसार, सुरुवातीला सराफा पेढीतील सोन्याचे दागिने वितळवून मिळवलेले सुमारे तीन लाख रुपये आणि दुकानाच्या गल्ल्यातून घेतलेली आणखी तीन लाख रुपयांची रोकड नाझियाला देण्यात आली. त्यानंतर व्हिडिओचे चित्रीकरण नष्ट करण्यासाठी तसेच विविध यंत्रणांकडून कारवाई होऊ नये, यासाठी पैसे द्यावे लागतील, असे सांगून तिच्याकडून वारंवार पैशांची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे.
फेब्रुवारी २०२५ ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत तक्रारदारांनी रोख रक्कम आणि ऑनलाइन व्यवहारांच्या माध्यमातून सुमारे चार कोटी रुपये दिल्याचे पोलिसांना सांगितले. १० ऑगस्ट २०२६ रोजी कुर्ला पश्चिमेतील न्यू मिल रोड येथे झालेल्या भेटीदरम्यान आणखी पैसे देणे शक्य नसल्याचे तक्रारदारांने नाझियाला सांगितले. त्यावेळी तिला पैसे देण्यास नकार दिल्यामुळे जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतरही पैशांसाठी तगादा सुरू राहिल्याने तक्रारदारांनी पोलिसांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला.
१८ ऑक्टोबर रोजी मुंबई गुन्हे शाखेच्या घाटकोपर युनिटमध्ये तक्रारदारांचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असताना नाझियाने पुन्हा फोन करून पैशांची मागणी केली. यानंतर पोलिसांनी तिला पकडण्यासाठी सापळा आखला. पाच लाख रुपयांच्या बंडलात पाचशे रुपयांच्या २० खऱ्या नोटा आणि ९८० खोट्या नोटा ठेवण्यात आल्या. तक्रारदार आणि पंचांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.
ठरल्याप्रमाणे पाच लाख रुपयांची रक्कम स्वीकारण्यासाठी नाझिया घाटकोपर पश्चिम येथील एल. बी. एस. मार्गावरील राधाकृष्ण हॉटेलजवळ आली असता, पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आणि अटक केली. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच तक्रारदारांकडून कथितरीत्या उकळण्यात आलेल्या सुमारे चार कोटी रुपयांचे व्यवहार कोणत्या माध्यमांतून झाले, याचा पुढील तपास मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा करीत आहे.


