( गुहागर )
गुहागर येथे एप्रिल महिन्यात ‘कासव महोत्सव’ आयोजित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून पर्यटकांना ऑलिव्ह रिडले कासवांच्या जीवनचक्राचा दुर्मीळ आणि थरारक अनुभव प्रत्यक्ष पाहता येणार आहे. नगर पंचायतीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यटन व्यावसायिक, पर्यटक आणि नागरिकांसाठी कांदळवन प्रतिष्ठान तर्फे विशेष प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत.
सध्या गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर सहा कासव संवर्धन केंद्रे उभारण्यात आली आहेत. या केंद्रांमधून दररोज कासवांची पिल्ले सुरक्षितपणे समुद्रात सोडली जात आहेत. वनविभागाच्या शेड्युल ‘अ’ श्रेणीतील ऑलिव्ह रिडले कासव या दुर्मीळ प्रजातीच्या संवर्धनासाठी हा उपक्रम महत्त्वाचा मानला जातो.
या महोत्सवामुळे गुहागरच्या समुद्र पर्यटनाला नवी दिशा मिळणार असून, पर्यटकांना निसर्गाशी जवळीक साधण्याची अनोखी संधी उपलब्ध होणार आहे. यासोबतच स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या संदर्भात झालेल्या बैठकीत नगराध्यक्ष नीता मालप, उपनगराध्यक्ष प्रदीप बेंडल, नगरसेवक, मुख्याधिकारी, पर्यटन व्यावसायिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. मार्गदर्शनासाठी विभागीय वनाधिकारी किरण ठाकूर, वेळास कासव महोत्सवाचे प्रणेते भाऊ काटदरे आणि कांदळवन प्रतिष्ठानचे मोहन उपाध्ये यांनी सहभाग घेतला.
भाऊ काटदरे यांनी कासव महोत्सवाच्या यशासाठी सर्व घटकांचे सहकार्य अत्यावश्यक असल्याचे सांगितले. कासव संवर्धनाशी संबंधित सर्व कामे वनविभाग आणि कांदळवन प्रतिष्ठानकडूनच केली जाणार असून नागरिकांनी त्यात अनावश्यक हस्तक्षेप करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.
मोहन उपाध्ये यांनीही कासव संवर्धनाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले. कासवांच्या पिल्लांना हाताळणे किंवा चुकीच्या पद्धतीने त्यांचा वापर करून जाहिरात करणे टाळावे, तसेच पर्यटनाच्या नावाखाली होणाऱ्या गैरप्रकारांना सुरुवातीपासूनच आळा घालणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
पर्यटकांना मार्गदर्शन, नियमांचे पालन आणि गुहागरचा इतिहास, निसर्गसौंदर्य, पक्षीनिरीक्षण व धार्मिक स्थळांची माहिती देऊन त्यांचा मुक्काम वाढविण्यावरही भर दिला जाणार आहे.

