(मुंबई / वृत्तसंस्था)
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाही देतानाच, शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नाची जबाबदारी शिवसेना स्वीकारेल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दसरा मेळाव्यात केली. शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, असे आश्वासन देत त्यांनी शिवसेनेच्या खासदार आणि आमदारांना लग्न ठरलेल्या शेतकऱ्यांच्या मुलींची यादी तयार करण्याचे निर्देश दिले. दुष्काळग्रस्तांना आर्थिक मदत, दिवाळीचा शिधा, सामूहिक विवाह सोहळे आणि विविध योजनांचा उल्लेख करत त्यांनी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. त्याचवेळी विरोधकांवर जोरदार टीका करताना ‘ऑपरेशन 3.0 कधी?’ या प्रश्नावरही त्यांनी सूचक विधान केले.
मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यात शिंदे यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांच्या समस्या, सरकारच्या योजना, हिंदुत्व आणि विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या ‘व्होट चोरी’च्या आरोपांवर भाष्य केले. राज्यात दुष्काळाचे संकट असताना शेतकऱ्यांनी चिंता करू नये, सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
“आम्ही फक्त भाषण देणारे नाही, तर शेतकऱ्यांना राशन देणारे आहोत,” असे सांगत शिंदे यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे आज असते, तर सण-उत्सव बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या मदतीला धावण्यास सांगितले असते, असे ते म्हणाले. त्यांच्या विचारांनुसारच आपण काम करत असल्याचे सांगत शेतकऱ्यांना दिवाळीचा शिधा देण्याचे काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ नये, यासाठी सरकारने ५ हजार रुपयांची मदत जाहीर केली असून तिचे वितरण सुरू झाले आहे, असे शिंदे यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात मदत करणे हे सरकारचे कर्तव्य असल्याचे नमूद करत त्यांनी केंद्र सरकारच्या सहकार्याचाही उल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला “शिंदेजी, चिंता करू नका,” असे आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी खडकासारखे खंबीरपणे उभे राहण्याचा शब्द दिल्याचेही शिंदे म्हणाले.
दुष्काळग्रस्त भागात मदतीने भरलेले शेकडो ट्रक पाठवण्यात आल्याचा दावा करत त्यांनी विरोधकांना थेट सवाल केला. “आम्ही शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्यास सुरुवात केली आहे, त्यामुळे तुम्ही कुठल्या तोंडाने आमच्यावर आरोप करता? आम्ही दुष्काळग्रस्त भागात मदतीने भरलेले शेकडो ट्रक पाठवले आहेत, तुम्ही साध्या बिस्कीटाचा पुडा तरी तिथल्या लोकांसाठी नेला का?” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. विरोधकांकडून दररोज टीका केली जात असली, तरी त्याला कामातून उत्तर देत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
शेतकऱ्यांच्या मुलींच्या विवाहासाठी शिवसेना पुढाकार घेणार असल्याचे जाहीर करताना शिंदे यांनी सामूहिक विवाह सोहळे आयोजित करण्याची घोषणा केली. ज्या शेतकऱ्यांच्या मुलींचे लग्न ठरले आहे, त्यांच्या विवाहाची जबाबदारी शिवसेना स्वीकारेल, असे त्यांनी सांगितले. यासाठी पक्षाच्या खासदार आणि आमदारांनी संबंधित मुलींची नावे संकलित करावीत, असे निर्देश त्यांनी भरसभेत दिले. शेतकऱ्यांच्या मुलींना २५ हजार सायकलींचे वाटप करण्याच्या योजनेचा शुभारंभ केल्याचेही त्यांनी सांगितले. परभणीत २५ हजार शिलाई मशीनचे वाटप केल्याचा उल्लेख करत विविध योजनांच्या माध्यमातून मदत सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांसाठी विविध सवलती दिल्याचे सांगताना शिंदे यांनी शिक्षण, कर्जवसुली, वीजबिले, चारा आणि पाणी यांच्याशी संबंधित उपाययोजनांचा उल्लेख केला. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याचा दावाही त्यांनी केला. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधकांना प्रत्युत्तर देताना संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
दसरा मेळाव्यात शिंदे यांनी विरोधकांच्या ‘व्होट चोरी’च्या आरोपांवरही टीका केली. विरोधक सोयीचे राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. २०१९ मध्ये भाजप-शिवसेना युतीला मतदान झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीसोबत सरकार स्थापन केले, या राजकीय घडामोडींचा संदर्भ देत शिंदे यांनी त्याला ‘खरी व्होट चोरी’ असे संबोधले. विरोधक न्यायव्यवस्था आणि घटनात्मक संस्थांवर हल्ले करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. इंडिया आघाडीची तुलना दहा तोंडांच्या रावणाशी करत या रावणाचे दहन करण्याचे आवाहन त्यांनी केले.
पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळमधील राजकीय परिस्थितीचा संदर्भ देत शिंदे यांनी विरोधकांवर अराजकता पसरवण्याचा आरोप केला. “हा नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश किंवा पाकिस्तान नाही, तर हिंदुस्थान आहे. हा नवा भारत आहे, पाकिस्तानच्या घरात घुसून मारणारा भारत आहे,” असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेचे समर्थन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या विरोधकांनाही त्यांनी लक्ष्य केले. मोदी सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणावर अन्नधान्य आणि आर्थिक मदत दिली जात असल्याचा दावा त्यांनी केला.
“INDIA आघाडी हा दहा तोंडांचा रावण आहे. या रावणाची लंका आपल्याला जाळायची आहे आणि आता ती वेळ आली आहे,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या INDIA आघाडीवर जोरदार टीका केली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घ्यायचे, संविधानाचा उल्लेख करायचा आणि ज्या बाबासाहेबांनी देशाला लोकशाही दिली, त्याच लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम करायचे, असा आरोप करत शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. “खऱ्या अर्थाने संविधानाची हत्या तुम्हाला करायची आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.
दरम्यान, ‘ऑपरेशन 3.0’ कधी होणार, या प्रश्नावर शिंदे यांनी दिलेल्या उत्तराचीही मेळाव्यात चर्चा झाली. शिवसेनेतील राजकीय घडामोडी आणि पक्षात प्रवेश करणाऱ्या नेत्यांच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी ‘ऑपरेशन 1.0 आणि 2.0 झालं, आता 3.0 कधी?’ असा प्रश्न विचारल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर उत्तर देताना, “ऑपरेशन सांगून करत नाही आम्ही. डॉक्टर तारीख देतो, आम्ही थेट ऑपरेशन करतो,” असे सूचक विधान त्यांनी केले.
या संदर्भात खासदार श्रीकांत शिंदे यांचाही उल्लेख करत शिंदे म्हणाले की, पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. “लोकं का येत आहेत, याचा विचार करा. भली मोठी रांग लागली आहे,” असे सांगत त्यांनी शिवसेनेत येण्यासाठी अनेक जण इच्छुक असल्याचा दावा केला.
शिवसेनेची ताकद वाढल्याचे सांगताना पक्षाकडे सध्या १५ खासदार, ७४ आमदार आणि एक हजारांहून अधिक नगरसेवक असल्याचे शिंदे यांनी नमूद केले. ही ताकद बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची असल्याचेही ते म्हणाले. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन देतानाच विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देणाऱ्या या भाषणात शेतकऱ्यांच्या मुलींच्या विवाहाची जबाबदारी स्वीकारण्याची घोषणा आणि ‘ऑपरेशन 3.0’बाबतचे सूचक विधान हे दोन मुद्दे विशेष चर्चेत राहिले.


