(रत्नागिरी /प्रतिनिधी)
राजापूर तालुक्यातील शिवणे खुर्द गावात पत्रकार सिद्धेश मराठे यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी केलेल्या हल्ल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. ही गंभीर घटना गुरुवारी (२५ डिसेंबर) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात राजकीय वातावरण तापलेले असताना पत्रकारावर झालेल्या या हल्ल्यामुळे संशयाची सुई वेगळीच दिशा घेत आहे.
पत्रकार सिद्धेश मराठे हे सायंकाळी कामानिमित्त शिवणे खुर्द गावात गेले होते. काम आटोपून अॅक्टिव्हा दुचाकीवरून घरी परतत असताना भटवाडी स्टॉपजवळ दोन वाहनांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. यामध्ये पांढऱ्या रंगाची एक कार आणि थार वाहनाचा समावेश होता. काही अंतरावर मास्क घातलेल्या तीन ते चार जणांनी त्यांची दुचाकी अडवून किल्ली हिसकावून घेतली आणि अचानक हल्ला चढवला. घटनास्थळी अंधाराचा फायदा घेत हल्लेखोरांनी मराठे यांना हाताने तसेच काठ्यांनी बेदम मारहाण केल्याचे सांगितले जाते. मारहाणीनंतर दुचाकीची किल्ली फेकून देत हे हल्लेखोर देवाचे गोठणेच्या दिशेने पसार झाले. जखमी अवस्थेत सिद्धेश मराठे यांनी कसेबसे आपल्या घरापर्यंत पोहोचत कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच राजापूर पोलीस निरीक्षक यादव यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी गावचे पोलीस पाटील तसेच तंटामुक्त समितीचे अध्यक्ष उपस्थित होते. त्यानंतर उशिरा रात्री राजापूर पोलीस ठाण्यात सिद्धेश मराठे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पत्रकारावर झालेल्या या हल्ल्याचा विविध स्तरांतून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत असून, दोषींना तातडीने अटक करावी, अशी जोरदार मागणी सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार संघटना आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे. पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू असून, या प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेने जातो याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
ही बाब अत्यंत चिंताजनक
पत्रकारावर झालेल्या निर्घृण हल्ल्याला चोवीस तासांहून अधिक कालावधी लोटूनही हल्लेखोर मोकाट फिरत असल्याने कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांवर भर रस्त्यावर हल्ला होतो आणि तरीही दोषी अटक होत नाहीत, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. घटनेनंतर तातडीने गुन्हा दाखल झाला असला, तरी प्रत्यक्ष शोधमोहीम, नाकाबंदी, सीसीटीव्ही फुटेज तपासणी आणि संशयितांची चौकशी कितपत प्रभावीपणे झाली, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
….तर त्यांना कुणाचे पाठबळ आहे का?
नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडलेली ही घटना केवळ योगायोग आहे का, की कुणाच्या इशाऱ्यावर घडलेला प्रकार? या शक्यतेचा गांभीर्याने तपास होणे आवश्यक आहे. पत्रकार असुरक्षित असतील, तर सत्य बाहेर येणार कसे? अशा हल्ल्यांमुळे भयाचे वातावरण निर्माण होत असल्याचे चित्र आहे. चोवीस तास उलटूनही हल्लेखोर मोकाट असतील, तर त्यांना कुणाचे पाठबळ आहे का, असा संशय साहजिकच निर्माण होत आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याच जिल्ह्यात अशा घटना घडत असतील, तर सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षा तरी कितपत सुरक्षित आहे, असा थेट आणि अस्वस्थ करणारा सवाल आता उपस्थित होत आहे.
दोन वर्षापूर्वी याच तालुक्यात पत्रकार शशिकांत वारीशे…
पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांची मालिका पुन्हा एकदा डोके वर काढत असल्याने संतापाची लाट उसळली आहे. दोन वर्षापूर्वी याच तालुक्यात पत्रकार शशिकांत वारीशे यांच्यावर थार गाडी अंगावर घालून आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याने निर्घृण हत्या करण्यात आली होती. ती घटना डोळ्यासमोर येताच अंगावर काटा उभा राहतो. पत्रकार शशिकांत वारीशे हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. सत्य मांडण्याचे धाडस करणाऱ्या पत्रकाराला अक्षरशः चिरडून मारण्यात येते, ही घटना लोकशाहीसाठी काळा अध्याय ठरली. त्या प्रकरणातून धडा घेतला जाईल, पत्रकारांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना केल्या जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, राजापूर तालुक्यात पुन्हा पत्रकारावर हल्ला झाल्याने त्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केवळ निषेध पुरेसा नाही. दोषींवर कठोर कारवाई, हल्ल्यांमागील सूत्रधारांचा पर्दाफाश आणि पत्रकारांच्या सुरक्षेसाठी ठोस व परिणामकारक उपाययोजना तातडीने राबविणे आवश्यक आहे. अन्यथा ‘पत्रकारच सुरक्षित नाही, तर जनता सुरक्षित कशी?’ हा सवाल अधिक बोथट न राहता प्रशासनासाठी जळजळीत वास्तव ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

