(राजापूर)
पोलिस भरतीचे आमिष दाखवून लष्करी अधिकाऱ्याला पैसे द्यावे लागतील, असे सांगून मोरोशी (ता. राजापूर) येथील एका तरुणाची सुमारे ४ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी राजापूर पोलिस ठाण्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेर्पे (ता. कणकवली) येथील ज्ञानेश वसंत पांचाळ (वय ३२) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लवेश यशवंत कानडे (वय २८, रा. मोरोशी-गावकरवाडी, सध्या रा. अंबिकानगर, जोगेश्वरी पूर्व, मुंबई) यांनी ही तक्रार दिली आहे. त्यानुसार हा प्रकार डिसेंबर २०२० ते १२ ऑगस्ट २०२४ या कालावधीत घडला.
लवेश कानडे हे पदवीधर असून सध्या नोकरी करत आहेत. त्यांची ओळख ज्ञानेश पांचाळ याच्याशी झाली होती. पांचाळ याने पोलिस भरतीत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला. पुढे त्याने विजय सुतार नावाच्या लष्करी अधिकाऱ्याला पैसे द्यावे लागतील, असे सांगून लवेशकडून ४,९०,२०६ रुपये घेतले. मात्र, त्यानंतर ना नोकरी मिळाली, ना पैसे परत मिळाले. यामुळे आपण फसवणुकीला बळी पडलो असल्याचे लवेश यांच्या लक्षात आले. या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.