(रत्नागिरी)
नेतृत्वाचा विकास होण्यासाठी महाविद्यालयीन जीवनात राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस) हे एक आदर्श व्यासपीठ आहे. समाजसेवेची खरी जाणीव या शिबिरातून निर्माण होते, असे प्रतिपादन गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाचे (स्वायत्त) प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने तालुक्यातील केळये मजगाव येथे आयोजित विशेष शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
शिबिराचे उद्घाटन सरपंच सौ. सौरभी पाचकुडे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी भूषविले. याप्रसंगी उपसरपंच काशिनाथ बापट, पोलिस पाटील अशोक केळकर, ग्रामपंचायत सदस्य गजानन नाखरे, एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा. सचिन सनगरे, प्रा. उमा जोशी, प्रा हर्षदा पटवर्धन, स्वयंसेवक उपस्थित होते.
ग्रामस्थांच्या अपेक्षा आपल्या कृतीतून पूर्ण करणे हे एन.एस.एस. स्वयंसेवकांचे प्रमुख कर्तव्य आहे. एन.एस.एस. स्वयंसेवकांकडे नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची आणि त्या यशस्वीपणे पार पाडण्याची क्षमता असते. शिबिराच्या माध्यमातून त्यांचा नेतृत्व विकास घडतो. सात दिवसांची शिबिरातील मैत्री आयुष्यभरासाठी नातेसंबंध जोडणारी ठरते. नेतृत्व शिकण्यासाठी एन.एस.एस. हे प्रभावी व्यासपीठ असून ग्रामस्थ, पोलीस यंत्रणा, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आणि एन.एस.एस. स्वयंसेवक यांच्या सहकार्याने शिबिर यशस्वी होते, असे डॉ. साखळकर यांनी सांगितले.
सरपंच सौ. पाचगुडे यांनी एन.एस.एस.च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, शिस्त व सेवाभाव निर्माण होतो, असे सांगून शिबिरार्थींना शुभेच्छा दिल्या. उपसरपंच श्री. बापट यांनी शिबिरातील विविध उपक्रमांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. उमा जोशी यांनी केले.
एनएसएस स्वयंसेवकांनी पहिल्या दिवशी नदी परिसराची स्वच्छता केली. यामध्ये ९० ते १०० किलो प्लास्टीक, कापड, कचरा संकलन करण्यात आले. शिबिरात स्वच्छता अभियान, सर्वेक्षण, आरोग्य जनजागृती, व्यसनमुक्ती, व्यक्तिमत्त्व विकास व सामाजिक विषयांवरील उपक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती कार्यक्रम अधिकाऱ्यांनी दिली.

