(खेड / प्रतिनिधी)
तालुक्यातील सवेणी वळणवाडी येथे एका २५ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत्यूच्या काही वेळेपूर्वी संबंधित तरुणाने आपल्या पत्नीला व्हिडीओकॉलद्वारे हातात एक पांढऱ्या रंगाची गोळी दाखवली होती. काही वेळातच त्याचा मृत्यू झाल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून, पोलिसांनी घटनास्थळी आकस्मिक मृत्यूची नोंद करत शवविच्छेदनासाठी शवविच्छेदन अहवाल राखून ठेवला आहे.
कृष्णा एकनाथ पवार (वय २५, रा. सवेणी, वळणवाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी) असे मृताचे नाव आहे. दि. ५ जुलै २०२५ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्यांनी झाडांची नर्सरीमधून आपल्या पत्नीला मोबाईलवरून व्हिडीओकॉल केला होता. यावेळी त्यांनी हातात एक पांढऱ्या रंगाची गोळी दाखवली व कॉल कट केला. काही वेळातच ते घरी परतले.
पत्नीने गोळीबाबत विचारले असता, “तुला काय करायचंय?” असे म्हणत त्यांनी रागाने उत्तर दिले. त्यानंतर दोघे आणि मुलगा चहा पिऊन बसले. अचानक कृष्णा यांनी पत्नी आणि मुलाला जवळ घेतले आणि “मला आता जगायचं नाही” असे बोलून खाली कोसळले. ही घटना पाहून पत्नीने घाबरून मिठाचे पाणी दिले; मात्र उलटी झाली नाही. नंतर त्यांनी मामाला बोलावून घेतले आणि रिक्षाने कृष्णा यांना उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी येथे नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून, शवविच्छेदनासाठी मृतदेहाचा नमुना राखून ठेवण्यात आला आहे. खेड पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद (गु.र.क्र. ७२/२०२५) भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम १९४ अन्वये केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. मृत कृष्णा पवार यांच्या मृत्यूमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून विविध शक्यतांचा तपास सुरू आहे.