(मुंबई)
मुंबईत 1608 धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवण्यात आले असून, त्यामध्ये 1149 मशिदी, 48 मंदिरे, 10 चर्च, 4 गुरुद्वारे आणि 148 इतर धार्मिक स्थळांचा समावेश आहे. ही माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. राज्यात एकूण 3367 धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवण्यात आले असून, यामध्ये यापूर्वीच हटवले गेलेले 1759 भोंगेही सामाविष्ट आहेत. ही कारवाई सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यभरातील धार्मिक स्थळांवरील ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे. जर यानंतर कोणत्याही धार्मिक स्थळी पुन्हा भोंगे लावण्यात आले, तर संबंधित परिसरातील पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला जबाबदार धरले जाईल आणि त्यांच्यावर संबंधित कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल.
यावेळी फडणवीस यांनी गणेशोत्सव, दहीहंडी यांसारख्या पारंपरिक सणांदरम्यान उभारण्यात येणाऱ्या तात्पुरत्या मंडपांबाबतही स्पष्टीकरण दिले. त्यांनी सांगितले की, या सणांच्या आयोजनाला परवानगी मिळताना कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही, यासाठी राज्य सरकार आवश्यक ती खबरदारी घेणार आहे. नागरिकांच्या श्रद्धा आणि परंपरा जपतानाच कायद्याचे पालन होईल, यासाठी प्रशासन दक्ष असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

