(नवी दिल्ली)
भारतीय लष्कराने सोशल मीडियाच्या वापराबाबतचे धोरण बदलत जवान आणि अधिकाऱ्यांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत. या नव्या नियमांनुसार, लष्करी कर्मचारी इन्स्टाग्रामचा वापर केवळ पाहण्यासाठी आणि देखरेखीपुरताच करू शकतील. ते कोणतीही पोस्ट अपलोड करू शकणार नाहीत, तसेच लाईक, टिप्पणी किंवा रिपोस्ट करण्यासही मनाई करण्यात आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सऍप आणि टेलिग्रामसारख्या मेसेजिंग ॲप्सवर फक्त गोपनीय नसलेली माहिती शेअर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यूट्यूब आणि ट्विटर म्हणजेच एक्सचा वापरही केवळ माहिती मिळवण्यासाठी करता येईल. याशिवाय, लिंक्डइन, स्काईप आणि सिग्नल या ॲप्ससाठीही स्वतंत्र आणि कडक मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.
या बदलामागील मुख्य उद्देश जवानांना सोशल मीडियावरील कंटेंट समजून घेण्याची, त्यावर नजर ठेवण्याची आणि दिशाभूल करणारी किंवा बनावट माहिती ओळखण्याची मर्यादित मुभा देणे हा आहे. याआधी भारतीय सैन्यातील जवानांना ट्विटर वापरण्याची परवानगी होती, मात्र इन्स्टाग्रामवर अकाऊंट उघडण्यास मनाई होती. आता जवानांना इन्स्टाग्राम अकाऊंट उघडता येईल, पण ते फक्त दर्शक म्हणूनच वापरता येणार आहे.
लष्कराच्या सूत्रांनी सांगितले की, बदलत्या डिजिटल युगात सैन्याला पूर्णपणे सोशल मीडियापासून दूर ठेवणे शक्य नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून देश-विदेशातील घडामोडींची माहिती मिळाल्याने जवान अपडेट राहू शकतात. मात्र, कोणत्याही परिस्थितीत संवेदनशील किंवा रणनीतिक माहिती बाहेर जाऊ नये, यासाठी कठोर निर्बंध ठेवण्यात आले आहेत.
नोव्हेंबरमध्ये झालेल्या चाणक्य डिफेन्स डायलॉगमध्ये भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी स्मार्टफोनच्या गरजेवर भाष्य केले होते. सध्याच्या काळात जवानांना कुटुंबीयांच्या संपर्कात राहण्यासाठी आणि ई-बुक्स वाचनासाठी स्मार्टफोन आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाबाबतचे हे नवे धोरण महत्त्वाचे मानले जात आहे.

