(फुणगूस / एजाज पटेल)
हागणदारीमुक्त गाव असल्याचा फलक अभिमानाने झळकवणारे फुणगूस गाव खाडीभागातील मध्यवर्ती व वर्दळीचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. मात्र या गावातील मुख्य सार्वजनिक ठिकाणी आजतागायत एकही सार्वजनिक शौचालय नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचे चित्र समोर आले आहे. यासंदर्भात अलीकडेच प्रसारमाध्यमांतून वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांनी या बातमीचे स्वागत करत प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
फुणगूस हे खाडीभागातील प्रमुख बाजारपेठ असलेले गाव असून येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, बँका, शासकीय कार्यालये आहेत. तसेच सतत वाहनांची वर्दळ आणि नागरिकांची ये-जा सुरू असते. अशा ठिकाणी सार्वजनिक शौचालयाची नितांत गरज असतानाही ग्रामपंचायतीकडून जागा उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करून वर्षानुवर्षे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे रुग्ण, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
विशेष म्हणजे शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत “हागणदारीमुक्त गाव” म्हणून फुणगूसचा उल्लेख होत असताना प्रत्यक्षात सार्वजनिक सुविधांचा अभाव दिसून येतो. हागणदारीमुक्ततेचा फलक लावून जबाबदारी संपते का, असा सवाल आता ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. जनतेच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करणाऱ्या स्थानिक प्रशासनाच्या या भूमिकेचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
प्रसारमाध्यमांत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर तरी प्रशासन जागे होईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली होती. मात्र आजही “जागा उपलब्ध नाही” हाच जुनाच बहाणा पुढे केला जात असल्याने ग्रामपंचायतीच्या नकारात्मक भूमिकेवर टीका होत आहे. प्रत्यक्षात मुख्य रस्त्यालगत प्रशासनाच्या ताब्यात असलेली भूसंपादित जागा उपलब्ध असून त्या ठिकाणी सार्वजनिक शौचालय उभारल्यास हा प्रश्न सहज मार्गी लागू शकतो, असे मत जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे.
स्वच्छतेबाबत शासन कोट्यवधी रुपये खर्च करत असताना प्रत्यक्षात नागरिकांना आवश्यक सुविधा न मिळणे ही गंभीर बाब आहे. ग्रामपंचायतीने आपला नकाराचा हट्ट सोडून लोकांच्या गैरसोयीचा विचार करावा, तसेच रस्ता भूसंपादित जागेचा योग्य वापर करून तातडीने सार्वजनिक शौचालय उभारावे, अशी जोरदार मागणी आता फुणगूस ग्रामस्थांकडून होत आहे.
हागणदारीमुक्त गाव ही केवळ घोषणाच न राहता प्रत्यक्षात नागरिकांना सुविधा मिळाव्यात, यासाठी स्थानिक प्रशासनाने ठोस निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

