(पुणे)
आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय अर्थसहाय्य माध्यमिक शिष्यवृत्ती (एनएमएमएस) परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. नियमित शुल्कासह अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ ऑक्टोबर २०२५ असून, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत याबाबत माहिती देण्यात आली आहे.
या परीक्षेद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ९ वी ते १२ वीपर्यंत शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळते. पात्र विद्यार्थ्यांना प्रतिमाह १,००० रुपये, म्हणजेच वार्षिक १२,००० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. नववीत प्रवेश घेतल्यापासून ही शिष्यवृत्ती लागू होते आणि विद्यार्थी दहावी, अकरावी आणि बारावीमध्ये नियमितपणे उत्तीर्ण झाल्यास ती पुढील वर्षांमध्येही कायम राहते.
शिष्यवृत्ती टिकवण्यासाठी विद्यार्थ्याने दहावीत किमान ६० टक्के आणि अकरावीत किमान ५५ टक्के गुण मिळवणे बंधनकारक आहे. अर्जाची प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे –
- ११ ऑक्टोबरपर्यंत नियमित शुल्कासह अर्ज
- १२ ते २१ ऑक्टोबरदरम्यान विलंब शुल्कासह अर्ज
- २२ ते ३० ऑक्टोबरदरम्यान अतिविलंब शुल्कासह अर्ज
एनएमएमएस परीक्षा २१ डिसेंबर २०२५ रोजी होणार असून निकाल फेब्रुवारी २०२६ च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होईल. केंद्रीय विद्यालये, जवाहर नवोदय विद्यालये आणि खासगी विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते, मात्र ते शिष्यवृत्तीच्या लाभासाठी पात्र ठरणार नाहीत. अर्जदाराच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ३.५ लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

