(मुंबई)
भाजप आमदार गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील वाद जगजाहीर आहे. नुकतेच गणेश नाईक यांनी “ठाणे आणि नवी मुंबईत युती झाली नाही तरी भाजपाचाच महापौर होईल” असे विधान करून शिंदेंवर अप्रत्यक्ष टीका केली होती. या वक्तव्याला आता मंत्री उदय सामंत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
“गणेश नाईक म्हणजे भाजप नाहीत, ते सीनिअर नेते आहेत. मात्र शिंदे साहेब हे आमचे मुख्य नेते आहेत. त्यांच्यावर टीका केली तर कोणताही शिवसैनिक शांत बसणार नाही. त्या टीकेला उत्तर दिले जाईल,” असे सामंत म्हणाले.
“लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही” — सामंतांचा ठाम दावा
महायुती सरकारच्या काही योजना निधीअभावी अडचणीत आल्याच्या पार्श्वभूमीवर ‘लाडकी बहीण योजना’ही बंद होणार का, अशी चर्चा रंगली आहे. यावर उदय सामंत म्हणाले, “लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. या योजनेसाठी सरकार कटिबद्ध आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
महायुतीमध्ये सर्व काही आलबेल असल्याचे सांगताना सामंत म्हणाले, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचाच भगवा झेंडा फडकेल, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. प्रत्येक पक्षाला आपले उमेदवार हवे असतात, पण अंतिम निर्णय शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीसच घेतात. त्यामुळे उमेदवारीवरून आमच्यात कोणताही वाद नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
“कर्नाटक सरकार देशप्रेमी नाही” — सामंतांचा आरोप
राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदीची मागणी कर्नाटक सरकारने केली असल्याच्या पार्श्वभूमीवर सामंत म्हणाले, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही देशभक्तीने प्रेरित संघटना आहे. कर्नाटक सरकारला देशप्रेम नाही. ज्यांनी वारंवार सावरकरांचा अपमान केला, त्यांना देशप्रेमाचा अधिकार नाही,” असा घणाघाती आरोप त्यांनी केला. तसेच, महायुतीत पालकमंत्रिपदावरून कोणताही वाद नसल्याचे सांगत त्यांनी स्पष्ट केले, “ज्या जिल्ह्यात पालकमंत्री नाहीत, तिथलाही विकास थांबलेला नाही.”
राज ठाकरे यांच्या महाविकास आघाडीत जाण्याबाबत विचारले असता सामंत म्हणाले, “राज ठाकरे मविआत जातील की नाही, हे मला माहीत नाही. पण जर गेले, तर काँग्रेस पक्ष वारंवार सावरकरांचा अपमान करतो, कर्नाटकमध्ये मराठी लोकांवर अन्याय होतो, शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला जातो, या सर्व विषयांवर ते काँग्रेसला नक्कीच प्रश्न विचारतील,” असे त्यांनी नमूद केले.

