(मुंबई)
राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेसंदर्भात विधानपरिषद सदस्य जयंत आसगावकर यांनी पवित्र पोर्टल बंद करण्याची मागणी करत लक्षवेधी सूचना सादर केली. यावर उत्तर देताना शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी स्पष्ट केलं की, पवित्र पोर्टल बंद केले जाणार नाही, मात्र आवश्यक सुधारणा करून ही भरती प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि कार्यक्षम केली जाईल.
राज्यात २०१७ पासून उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी अनुदानित तसेच विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलचा वापर केला जात आहे. या पोर्टलच्या माध्यमातून शाळांमध्ये रिक्त पदांनुसार पात्र उमेदवारांची निवड केली जाते. मात्र, अनेकवेळा निवड झाल्यानंतर उमेदवार अनुपस्थित राहणे, अपात्र ठरणे, अशा अडचणी वारंवार निर्माण होत आहेत.
डॉ. भोयर म्हणाले की, “उच्च गुणवत्ता असलेल्या उमेदवारांना संधी मिळावी यासाठी पवित्र पोर्टलमध्ये आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील. याशिवाय, ज्या उमेदवारांची आधीच नियुक्ती झाली आहे, त्यांची नावे पोर्टलवरून हटवण्याचे निर्देश विभागाला देण्यात येणार आहेत. संस्थाचालकांना एक पारदर्शक, जलद आणि विश्वासार्ह भरती प्रक्रिया उपलब्ध करून देणे सरकारचे उद्दिष्ट आहे.”
राज्यमंत्री भोयर यांनी आश्वासन दिलं की, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं यासाठी शिक्षक भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबवली जाईल. शासन सर्व योग्य सूचनांचा विचार करून पवित्र पोर्टल अधिक सक्षम आणि उपयुक्त बनवण्यासाठी ठोस पावले उचलेल.
पवित्र पोर्टल बंद होणार नाही; सुधारणा करून शिक्षक भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक, कार्यक्षम आणि शाळांनुसार उपयुक्त बनवली जाणार असल्याचे शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केले.