(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्ह्यात “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” या विशेष आरोग्य अभियानाला महिलांकडून आणि नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा परिषद रत्नागिरीचा आरोग्य विभाग आणि जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान राबविण्यात आले. महिलांच्या आरोग्य तपासणीसह उपचार आणि समुपदेशन सेवा देणे तसेच महिलांना त्यांच्या आरोग्याबद्दल जागरूक करणे हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट होते.
या कालावधीत जिल्हाभरातील ग्रामीण व शहरी भागात एकूण ३८३९ आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली. या शिबिरांतून दोन लाखांहून अधिक नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. या अभियानांतर्गत स्तन, मुख आणि गर्भाशय मुख कर्करोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, रक्तक्षय आणि असंसर्गजन्य आजार यांची तपासणी करण्यात आली. तसेच गर्भवती महिलांसाठी प्रसूतिपूर्व काळजी तपासणी, किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी स्वच्छता आणि पोषण विषयक मार्गदर्शन, बालकांना लसीकरण सेवा, आयुष्मान भारत आणि ‘वय वंदन’ कार्ड वाटप, रक्तदान आणि अवयवदान मोहिमा, क्षयरोग तपासणी व निक्षय मित्र नोंदणी अशा विविध सेवा पुरविण्यात आल्या.
या मोहिमेत उच्च रक्तदाबाची तपासणी २८,३०२ व्यक्तींवर, मधुमेह तपासणी ३०,९८५ व्यक्तींवर, तर कर्करोग तपासणी १४,७७७ व्यक्तींवर करण्यात आली. रक्तक्षय तपासणीसाठी ४३,२७६ नागरिकांनी सहभाग घेतला, तर गर्भवती महिलांची ४,२१४ तपासणी करण्यात आली. किशोरवयीन मुलींमध्ये १६,१२९ जणींना मासिक पाळी स्वच्छतेबाबत समुपदेशन देण्यात आले. बालकांच्या लसीकरणाचा लाभ ४,८४१ मुलांनी घेतला. क्षयरोग तपासणी शिबिरांत २५,९३१ व्यक्तींची तपासणी झाली असून २९३४ जणांची क्ष-किरण तपासणी व ६७० NAAT चाचण्या घेण्यात आल्या. निक्षय मित्र म्हणून ८८५ नागरिकांची नोंदणी झाली तर ८६ क्षयरुग्णांना फूड बास्केटचे वाटप करण्यात आले. आयुष्मान भारत आणि वय वंदन कार्डांचे वाटप ३९,२४२ नागरिकांना करण्यात आले, तर रक्तदाता नोंदणी (E-Raktkosh) मध्ये ७१५ जणांनी सहभाग घेतला.
या अभियानामुळे महिलांमध्ये आरोग्य तपासणीबाबत जागरूकता निर्माण झाली, आजारांचे लवकर निदान होऊन कुटुंबांच्या आरोग्याची पातळी सुधारण्यास मदत झाली, असा निष्कर्ष जिल्हा आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे. या संपूर्ण मोहिमेचे यशस्वी आयोजन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, ग्रामपंचायती, स्थानिक संस्था, महिला व बालविकास विभाग, शिक्षण विभाग तसेच खाजगी आरोग्य संस्थांच्या सहकार्याने ही मोहीम प्रभावीपणे पार पडली. “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” अभियानामुळे महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता वाढली असून, संपूर्ण जिल्ह्यात आरोग्य तपासणी संस्कृती बळकट करण्यास या उपक्रमाने हातभार लावला आहे.

