(संगमेश्वर / प्रतिनिधी)
देवरुख शहरात भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रस्त्यांवर मुक्त संचार करणाऱ्या मोकाट कुत्र्यांनी आता थेट वाहनांनाच लक्ष्य करण्यास सुरुवात केल्याने वाहनधारकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. विशेषतः दुचाकींच्या सीट कव्हर्स फाडून टाकण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांना आर्थिक फटका बसत आहे.
देवरुख पोलीस ठाण्याच्या परिसरात उभ्या असलेल्या पोलिसांच्या दुचाक्याही या उपद्रवापासून वाचलेल्या नाहीत. उपलब्ध माहितीनुसार, पोलीस ठाणे परिसरातील किमान आठ ते दहा दुचाक्यांच्या सीट कव्हर्सचे नुकसान भटक्या कुत्र्यांनी केल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या यंत्रणेच्या वाहनांनाही या समस्येचा सामना करावा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरातील विविध भागांत भटक्या कुत्र्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढल्याने रात्रीच्या वेळी पादचारी तसेच दुचाकीस्वारांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी कुत्र्यांचे कळप रस्त्यांवर वावरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी हा प्रश्न अधिक गंभीर ठरत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणाची जबाबदारी नगर पंचायतीकडे असताना या समस्येवर प्रभावी उपाययोजना होत नसल्याची नाराजी नागरिक व्यक्त करत आहेत. वाढत्या तक्रारी असूनही प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नसल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे. दरम्यान, वाहनांचे होणारे नुकसान आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता देवरुख नगर पंचायतीने तातडीने विशेष मोहीम राबवून भटक्या कुत्र्यांचे निर्बीजिकरण, पुनर्वसन आणि नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

