(मुंबई)
नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता महाराष्ट्रात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामविकास विभागाने मतदान प्रक्रियेत महत्त्वाचा बदल केला असून EVM आणि बॅलेट पेपरवर उमेदवारांची नावे लावण्याचा क्रम बदलण्यात आला आहे.
यापुढे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये उमेदवारांची नावे ठरावीक गटांनुसार दिसणार आहेत. सर्वप्रथम राष्ट्रीय पक्ष आणि महाराष्ट्रातील मान्यताप्राप्त राज्यस्तरीय पक्षांचे उमेदवार, त्यानंतर इतर राज्यांतील राज्यस्तरीय पक्ष, मग अमान्यताप्राप्त राजकीय पक्ष आणि शेवटी अपक्ष उमेदवार असा हा नवा क्रम असेल.
या संदर्भात ग्रामविकास विभागाने राजपत्र (गॅझेट) अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम १९६१ मधील तरतुदीनुसार राज्य निवडणूक आयुक्तांशी चर्चा करून हे नियम लागू करण्यात आले आहेत.
यापूर्वी काय पद्धत होती?
याआधी EVM किंवा बॅलेट पेपरवर उमेदवारांची नावे मराठी वर्णमालेनुसार आडनावाच्या क्रमाने लावली जात होती. त्यामुळे अनेक वेळा राष्ट्रीय किंवा राज्य पक्षांचे उमेदवार यादीत खाली जात होते आणि मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होत होता.
नवे नियम काय सांगतात?
सुधारित महाराष्ट्र पंचायत समिती नियम १९६२ नुसार उमेदवार चार गटांत विभागले जातील. प्रत्येक गटातील उमेदवारांचा अंतर्गत क्रम मराठी वर्णमालेनुसार आडनाव, नाव आणि पत्ता यानुसार ठरवला जाईल.
EVM वर उमेदवारांचा क्रम असा असेल:
– सर्वात वर: राष्ट्रीय पक्ष आणि महाराष्ट्रातील मान्यताप्राप्त राज्य पक्ष
– त्याखालोखाल: इतर राज्यांतील राज्यस्तरीय पक्ष
– नंतर: अमान्यताप्राप्त राजकीय पक्ष
– सर्वात शेवटी: अपक्ष उमेदवार
हा बदल केवळ जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी लागू राहणार आहे. मान्यताप्राप्त पक्षांचे उमेदवार EVM वर वर दिसल्याने मतदारांना उमेदवार ओळखणे सोपे जाईल, असा दावा ग्रामविकास विभागाने केला आहे.
पूर्व प्रसिद्धीशिवाय हे नियम तातडीने लागू करण्यात आले असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवार आणि मतदारांसाठी ही माहिती महत्त्वाची ठरणार आहे.

