( मुंबई )
शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र येण्याचा निर्णय झालेला असला, तरी महापालिका निवडणुकीतील जागावाटपाचा तिढा अजून पूर्णपणे सुटलेला नाही. मराठीबहुल आणि मागील निवडणुकीत शिवसेनेने जिंकलेल्या दहा प्रभागांवर दोन्ही पक्ष आग्रही असल्याने चर्चा लांबत असल्याची माहिती आहे.
हा तिढा सोडवण्यासाठी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, तर खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली. यानंतर राऊत यांनी दोन भावांमध्ये मनोमिलन झाले असून मुंबईसह ठाणे, नाशिक, कल्याण-डोंबिवली आदी महानगरपालिकांबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात आल्याचा दावा केला. शिवसेना-मनसे युतीची घोषणा वाजतगाजत केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हिंदी सक्तीविरोधी मोर्चाच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र आले आणि त्यानंतर राजकीय युतीची चर्चा सुरू झाली. मात्र, मनसेने शिवसेनेचे प्राबल्य असलेल्या काही जागांवर दावा केल्याने, निवडणूक जाहीर होऊनही बैठकींच्या फेऱ्या सुरूच राहिल्या. सोमवारी दिवसभर मातोश्री आणि शिवतीर्थावर जोरदार हालचाली सुरू होत्या.
सूत्रांच्या माहितीनुसार बहुतांश जागांचा तिढा सुटला असला, तरी शिवडी, दादर, माहीम, भांडुप आणि विक्रोळीतील काही जागांवरून अजूनही रस्सीखेच सुरू आहे. हा परिसर मराठीबहुल असल्याने दोन्ही पक्षांची भूमिका कठोर आहे. मात्र, या जागांवरून फार ताणू नका, अशा सूचना राज ठाकरे यांनी दिल्याने अनेक प्रश्न मार्गी लागल्याचे समजते. भांडुप आणि विक्रोळीवर मात्र उशिरापर्यंत खलबते सुरू होती.
महाविकास आघाडीत मतभेद टाळून मुंबई महापालिकेत राज ठाकरे यांच्यासह एकत्र लढावे, असे आवाहन काँग्रेसला केल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. मात्र, काँग्रेस मुंबईत स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेवर ठाम असून मुंबईबाहेर मात्र एकत्र येण्यास तयार असल्याचे त्यांनी नमूद केले. भाजपचा पराभव करायचा असेल तर मतभेद बाजूला ठेवून एकत्र येणे गरजेचे असल्याचे राऊत म्हणाले.
राहुल गांधींशी फोनवर चर्चा
मुंबई महापालिकेत भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र राहावी, यासाठी संजय राऊत आणि राहुल गांधी यांच्यात फोनवर चर्चा झाल्याची माहिती आहे. भाजपविरोधात एकत्र लढण्याची भूमिका राऊत यांनी मांडल्याचे समजते. ठाकरे बंधूंसोबत शरद पवार गटाची राष्ट्रवादीही येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीने मुंबईसाठी सुमारे ५० जागांचा प्रस्ताव दिल्याचे सांगितले जाते. यापैकी २५ ते ३० जागांवर तोडगा निघू शकतो, अशी चर्चा आहे.
मुंबई महापालिकेत ताकद दाखवण्यासाठी ठाकरे बंधू युतीची घोषणा करताना मोठे शक्तिप्रदर्शन करू शकतात. हे नाटक नसून प्रीतिसंगम असल्याचे सांगत संजय राऊत यांनी विरोधकांवर टोला लगावला आहे.
महायुतीतही धुसफूस
दरम्यान, भाजप-शिवसेना महायुती एकत्र निवडणूक लढणार असल्याचे चित्र असले, तरी कल्याण-डोंबिवली महापालिकेबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या विधानामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. ठाणे आणि केडीएमसीत जागावाटपावरून मतभेद कायम असून महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत.

