(नाशिक/गाणगापूर/प्रतिनिधी)
तमाम सेवेकर्यांनी गाणगापूर तीर्थक्षेत्री केलेल्या निष्काम सेवेमुळे श्री दत्तप्रभूंची निश्चितच कृपा होऊन राष्ट्रावरील सारी अरिष्टे टळतील असा विश्वास अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली श्री आण्णासाहेब मोरे यांनी व्यक्त केला तेव्हा उपस्थित हजारो सेवेकर्यांनी टाळ्यांचा जोरदार कडकडाट करून स्वामीनामाचा जयघोष केला.
सेवामार्गाच्या गाणगापूर दत्तपीठावर ऑक्टोबर महिन्याचा मासिक सत्संग सोहळा नुकताच उत्साही वातावरणात पार पडला. या निमित्ताने विविध सेवा आणि उपक्रम संपन्न झाले.गुरुमाऊली यांच्यासह गुरुमाता सौ मंदाकिनीताई मोरे व गुरुपुत्र नितीनभाऊ मोरे यांची यावेळी विशेष उपस्थिती होती.
परमपूज्य गुरुमाऊली श्री. मोरे सेवेकऱ्यांना संबोधित करताना म्हणाले की, दत्त महाराजांनी गाणगापूर सारख्या महान तीर्थक्षेत्राची निर्मिती करून अखिल मानव जातीचे कल्याण केले आहे. अशा सदैव दैवी स्पंदनांनी भारलेल्या वातावरणात सेवेकऱ्यांना दत्त महाराज आणि स्वामी महाराजांच्या कृपेमुळे सेवेची अपूर्व संधी मिळाली. हे सारे सेवेकरी भाग्यवान आणि पुण्यवान आहेत. असे कौतुकोद्गार त्यांनी काढले.
उज्जैन येथे राष्ट्रीय सत्संग सोहळा
५ जानेवारी २०२६ रोजी उज्जैन येथे राष्ट्रीय सत्संग सोहळा आयोजित करण्यात आला आहे तर २३ ते २७ जानेवारी २०२६ या काळात नाशिक येथे जागतिक कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे २० फेब्रुवारी रोजी श्री क्षेत्र पीठापूर येथील दत्तपीठावर अठरा विभागांचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. तसेच गिरनार मेळाव्याची तारीखही लवकरच कळवली जाईल अशी आगामी कार्यक्रमांची माहिती गुरुमाऊली श्री मोरे यांनी मासिक सत्संगात जाहीर केली तेव्हा सेवेकर्यांनी टाळ्यांचा जोरदार कडकडाट केला.
श्री घोरकष्टोद्धारक पूजनासह अतिउच्च सेवा
मासिक सत्संगानिमित्त दत्तपीठावर सायंकाळच्या प्रसन्न वातावरणात लक्ष दिवे एकाच वेळी प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला तर पापविनाशी तीर्थावर परमपूज्य गुरुमाऊली उभयतांनी भीमा- अमरजा नद्यांचे विधिवत पूजन केले. दत्तपीठावर सलग तीन दिवस श्रीघोर कष्टोध्दारक पादुका पूजनाचा सोहळा संपन्न झाला तर मासिक महासत्संगाच्या दिवशी सेवेकर्यांनी सामूहिक श्री दत्तात्रय वज्रकवच पठणाची आणि सत्यनारायण पूजेची सेवा श्रींच्या चरणी समर्पित केली. या सर्व सेवा आणि उपक्रमांमध्ये हजारो सेवेकरी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने सहभागी झाले होते. सर्व उपक्रम यशस्वी करण्यासाठी गुरुपुत्र नितीनभाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडा आणि सोलापूरमधील सेवेकऱ्यांसह देश-विदेश अभियान आणि बालसंस्कार विभागाच्या प्रतिनिधींनी अविश्रांत मेहनत घेतली.

