(रत्नागिरी)
भरधाव व बेदरकारपणे टाटा टिपर चालवल्यामुळे झालेल्या अपघातप्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात शनिवार, 20 डिसेंबर रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास जयगड–निवळी मार्गावरील चाफे धनगरवाडा येथे घडला.
या प्रकरणात दिनेशकुमार खेद यादव (वय 45, रा. उत्तरप्रदेश) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित चालकाचे नाव आहे. याप्रकरणी टाटा टिपरवरील क्लिनर आशुतोष संतोषकुमार यादव (वय 22, रा. पनवेल, रायगड) यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, चालक दिनेशकुमार यादव हा आपल्या ताब्यातील टाटा टिपर (क्र. MH-46-DC-8010) घेऊन जयगड ते निवळी या मार्गावरून अत्यंत वेगाने जात होता. चाफे धनगरवाडा येथील पुष्प काजू बागेसमोर आल्यानंतर त्याचा वाहनावरील ताबा सुटला. परिणामी, टिपर रस्त्याच्या डाव्या बाजूच्या साईड पट्टीवरून घसरत पलटी झाला.
या अपघातात वाहनातील मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, टाटा टिपरचेही गंभीर नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अपघातामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
या घटनेची नोंद जयगड पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

