(जैतापूर / वार्ताहर)
राजापूर तालुक्यातील कोंढेतड येथे श्री गणेश क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित कै. रवींद्र कुळी स्मृती भव्य ऑव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना विलये इलेव्हन आणि एमसीसी दळे यांच्यात उत्साहात पार पडला. अंतिम सामन्यात विलये इलेव्हन संघाने दळे संघावर एकतर्फी मात करत शानदार विजय मिळवून यंदाच्या स्पर्धेचा चषक पटकावला.
कै. रवींद्र कुळी यांच्या स्मरणार्थ भरविण्यात आलेल्या या स्पर्धेचे यंदाचे वर्ष विशेष ठरले असून स्पर्धेने यशस्वीरीत्या २७व्या वर्षात पदार्पण केले. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेला तालुक्यासह परिसरातील क्रिकेटप्रेमींचा मोठा प्रतिसाद लाभला. अंतिम सामन्यानंतर विजेता, उपविजेता तसेच तृतीय व चतुर्थ क्रमांकाच्या संघांना आकर्षक रोख बक्षिसे व चषक देऊन गौरविण्यात आले. यासोबतच उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, मालिकावीर, सामनावीर आदी वैयक्तिक कामगिरीसाठीही स्वतंत्र रोख पारितोषिके व स्मृतिचिन्हे प्रदान करण्यात आली.
या स्पर्धेत दळे संघाचा प्रसाद लासे याने संपूर्ण स्पर्धेत केलेल्या दमदार कामगिरीमुळे मालिकावीर पुरस्कार पटकावला. गांगेश्वर हातिवले संघाच्या सुरज धालवलकर याला उत्कृष्ट फलंदाज, विलये संघाच्या सुरज परवडी याला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, तर अंतिम सामन्यात निर्णायक भूमिका बजावणाऱ्या विलये संघाच्या स्वरूप कदम याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
या स्मृती चषक स्पर्धेचा शुभारंभ शिवसेनेच्या युवा नेत्या अपूर्वा ताई सामंत यांच्या हस्ते करण्यात आला होता. पारितोषिक वितरण समारंभाला शिवसेनेचे प्रकाश कुवळेकर, अविनाश पराडकर, नरेश दुधवडकर, पत्रकार राजन लाड, मोहन पाडावे, राजन कुवळेकर, अशपाक मापारी, जितेंद्र तुळसवडेकर, बबन तांबे पवार गुरुजी, तोफिक जैतापकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मंडळाच्या वतीने सर्व मान्यवरांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
या यशस्वी आयोजनासाठी श्री गणेश क्रीडा मंडळाचे अध्यक्ष श्री. मंगेश कुवळेकर, सेक्रेटरी विजय कोतरे, खजिनदार शेखर कुवळेकर, उपखजिनदार नितीन तिर्लोटकर यांच्यासह सल्लागार विद्याधर कोतरे, संदेश कुवळेकर, महेंद्र कुळी, अरुण कोतरे तसेच सदस्य विष्णू कुवळेकर, अंकुश धोपटे, संतोष कुवळेकर व इतर सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. तीन दिवसांच्या या स्पर्धेसाठी मुंबईसह विविध ठिकाणांहून आलेल्या युवक कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीमुळे स्पर्धा शिस्तबद्ध व यशस्वीरीत्या पार पडली.
कै. रवींद्र कुळी यांच्या स्मरणार्थ आयोजित या क्रिकेट स्पर्धेने क्रीडासंस्कृती जपतानाच नवोदित खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले, अशी भावना यावेळी उपस्थित क्रिकेटप्रेमींनी व्यक्त केली.

