(मुंबई)
राज्यातील मुंबई महापालिकेसह 29 महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने 15 डिसेंबर रोजी जाहीर केला असून, त्यानंतर संबंधित महापालिका हद्दीत आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत इच्छुक उमेदवार तयारीला लागले असले तरी, नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी अवघा एक दिवस बाकी असताना देखील जागावाटप अद्याप जाहीर झालेले नाही, त्यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार 23 डिसेंबरपासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरुवात होणार असून, 30 डिसेंबर ही अंतिम मुदत असणार आहे. मात्र, राज्यातील सत्ताधारी महायुती, विरोधकांची महाविकास आघाडी तसेच ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीतील जागावाटपाचे गणित अद्याप सुटलेले नाही. परिणामी अनेक इच्छुक उमेदवार ‘पाण्यात देव टाकून’ बसले असून, जागावाटपाचा तिढा सुटल्याशिवाय उमेदवारी निश्चित होणार नाही, अशी स्थिती आहे.
15 जानेवारी रोजी होणाऱ्या 29 महापालिकांच्या निवडणुकांकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. नगरपालिका व नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकांतील अलीकडील विजयामुळे सत्ताधारी पक्ष उत्साहित असला, तरी महापालिका निवडणुकीसाठी नव्याने आणि अधिक काटेकोर तयारी करावी लागणार आहे. दुसरीकडे, विरोधी पक्षांनाही या निवडणुकीत घवघवीत यश मिळवण्यासाठी नव्या जोमाने, सखोल नियोजनासह मैदानात उतरावे लागणार आहे.
मात्र, हे सर्व शक्य होण्यासाठी 30 डिसेंबरपूर्वी जागावाटपाचा तिढा सोडवणे अत्यावश्यक आहे. उमेदवारांची निवड, प्रचार यंत्रणा उभारणे, आर्थिक व संघटनात्मक मदत देणे या सर्व गोष्टी युद्धपातळीवर पूर्ण कराव्या लागणार आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जागावाटपावर अंतिम निर्णय जाहीर होण्याची उत्सुकता राज्यभरात शिगेला पोहोचली आहे.

