(नागपूर)
नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांमध्ये राज्यभर भारतीय जनता पार्टीने (BJP) अभूतपूर्व यश संपादन केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील मतदारांचे मनापासून आभार मानले. महायुतीच्या जोरदार कामगिरीवर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले की, “मी आधीच भाकीत केले होते की एकूण निवडून येणाऱ्या नगराध्यक्षांपैकी सुमारे 75 टक्के नगराध्यक्ष महायुतीचे असतील. महाराष्ट्राच्या जनतेने तसाच कौल दिला आहे. भारतीय जनता पार्टी हा राज्यातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.”
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “राज्यात 129 नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे निवडून आले आहेत. महायुतीतील तिन्ही पक्षांचे मिळून नगराध्यक्ष जवळपास 75 टक्के आहेत. नगरसेवकांच्या बाबतीत तर भाजपाने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. 2017 मध्ये भाजपाकडे 1600 नगरसेवक होते, तर यावेळी तब्बल 3325 नगरसेवक भाजपाचे निवडून आले असून, एकट्या भाजपाचे 48 टक्के नगरसेवक आहेत.” यावेळी त्यांनी महायुतीतील सहकारी नेते एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचेही अभिनंदन केले.
रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात पहिलीच निवडणूक, मोठे यश
या निवडणुकीत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच निवडणूक लढवली गेली आणि त्यात पक्षाला मोठे यश मिळाले, असे फडणवीस यांनी सांगितले. “रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे तसेच मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांनी या विजयासाठी प्रचंड मेहनत घेतली,” असेही त्यांनी नमूद केले.
विकासाच्या मुद्द्यावर सकारात्मक प्रचाराला जनतेचा प्रतिसाद
मुख्यमंत्री म्हणाले, “या निवडणुकीत मी पूर्णतः सकारात्मक प्रचार केला. कोणत्याही विरोधी पक्षावर किंवा नेत्यावर टीका न करता आम्ही विकासाच्या मुद्द्यावर मतं मागितली. आम्ही काय केलं आणि पुढे काय करणार आहोत, यावरच भर दिला. जनतेने याला चांगला प्रतिसाद दिला आणि आम्हाला निवडून दिलं. विकासकामांना मिळालेली ही जनतेची पावती आहे.”
भाजपा शहरापुरती मर्यादित नाही – फडणवीस
“भाजपा हा फक्त शहरापुरता मर्यादित पक्ष आहे, असा गैरसमज होता. मात्र 2024 नंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत भाजपाने शहर आणि ग्रामीण भागात समान यश मिळवलं आहे. भाजपा हा सर्व समाजांचा, सर्व जातींचा आणि सर्व भौगोलिक भागात विस्तारलेला पक्ष आहे. आज महाराष्ट्राचा नंबर वन पक्ष भाजपाच आहे,” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
नागपूर, गडचिरोलीत उल्लेखनीय यश; चंद्रपूरबाबत आत्मपरीक्षण
नागपूर जिल्ह्यात भाजपाला विशेष यश मिळाल्याचे सांगताना त्यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे कौतुक केले. “जवळपास 30-35 वर्षांनंतर कामठीमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष निवडून आला आहे. गडचिरोलीतही आम्हाला चांगले यश मिळाले. चंद्रपूर जिल्ह्यात जिथे अपेक्षित यश मिळाले नाही, तिथे निश्चितच आत्मपरीक्षण केले जाईल,” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

