( मुंबई )
काही दिवसांपूर्वी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयाच्या भूमिपूजन सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. या दौऱ्यादरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शाह यांच्यावर ‘अॅनाकोंडा’ अशी उपमा देत त्यांच्यावर टीका केली होती. आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर तीव्र हल्लाबोल करत सत्ताधाऱ्यांना ‘तीन साप’ अशी उपमा दिली आहे.
मंगळवारी कल्याणमधील शिवाजीनगर आणि अशोकनगर येथील उपशहर संघटक कांचन लोंढे यांनी शेकडो सहकाऱ्यांसह मातोश्रीवर शिवसेना (उबाठा) पक्षात प्रवेश केला. या प्रसंगी बोलताना ठाकरे म्हणाले, “सध्या महाराष्ट्रात सत्तेसाठी तीन साप एकत्र आले आहेत. हे साप आता एकमेकांनाच गिळू पाहत आहेत. त्यांच्या शेपट्या एकमेकांच्या तोंडात आले आहेत. मग अशा स्थितीत जनतेकडे कोण पाहणार? सत्तेसाठी सुरू असलेली ही साठमारी राज्याच्या हितासाठी नव्हे, तर वैयक्तिक फायद्यासाठी आहे.”
बीडचा संदर्भ देत टोला
आपली लढाई आता फक्त शिवसेनेपुरती नाही. शिवसेना ही मराठीसाठी, हिंदुंसाठी आणि महाराष्ट्रासाठी शिवसेनाप्रमुखांनी स्थापन केली होती. तोच हे गद्दार विसरले आहेत आणि सत्तेसाठी वाट्टेल ते करायला तयार झाले आहेत. बीडमधील अलीकडच्या राजकीय घडामोडींवरही उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. ते म्हणाले, “स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या काळात आपण बीडला झुकते माप देत होतो. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. बीडची विल्हेवाट लागली आहे. एकदा चूक झाली तर ती सुधारता येते, पण तीच चूक वारंवार होऊ नये. चूक लक्षात आल्यावर ती दुरुस्त करण्याची संधी मिळाली पाहिजे.”
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला लक्ष्य
मराठवाड्याच्या दौऱ्यात शेतकऱ्यांची बिकट स्थिती पाहिल्याचा उल्लेख करत ठाकरे म्हणाले, “अतिवृष्टीमुळे शेतकरी हतबल झाला आहे. अजूनही अनेकांना सरकारची मदत मिळालेली नाही. सत्तेसाठी सुरू असलेल्या या राजकीय नाट्यात बळीराजाचा विसर पडला आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे हीच खरी आपली जबाबदारी आहे.”

