(संगमेश्वर / एजाज पटेल)
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथे हॉटेल ड्राईव्ह-इन समोर असलेल्या डायवर्शनच्या ठिकाणी मोटारसायकल व चारचाकी वाहनाचा अपघात रविवारी दुपारी सुमारे बारा वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून दुचाकीस्वारास किरकोळ दुखापत झाली आहे.
अपघातात सहभागी चारचाकी वाहनाचा क्रमांक एमएच 03 बीएस 2616 तर दुचाकीचा क्रमांक एमएच 46 सीएच 1064 असा आहे. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला.
महत्त्वाचे म्हणजे, ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या डायवर्शन मार्गावर यापूर्वीही अनेक अपघात घडले आहेत. स्थानिक नागरिक व वाहनचालकांच्या मते, महामार्गवर अनेक ठिकाणी डायवर्शनच्या ठिकाणी ठेकेदाराकडून आवश्यक त्या ठिकाणी मार्गदर्शक फलक, सूचनाफलक, इशारे तसेच योग्य रिफ्लेक्टर लावण्यात आलेले नाहीत. तसेच डायवर्शनचा रस्ता अत्यंत नादुरुस्त असून खड्डे, अरुंद वळणे आणि अचानक वळवलेला मार्ग अपघाताला कारणीभूत ठरत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
आजच्या अपघातानंतर घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी ठेकेदार तसेच त्याला पाठीशी घालणाऱ्या महामार्ग प्राधिकरणावर तीव्र संताप व्यक्त केला. योग्य नियोजन आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना न केल्यामुळेच वारंवार अपघात घडत असल्याचे सांगत, या अपघाताचे खापर थेट संबंधित ठेकेदार आणि महामार्ग प्रशासनावर फोडण्यात आले.
दरम्यान, या अपघाताबाबत अद्याप पोलीस ठाण्यात कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नसल्याची माहिती संगमेश्वर पोलिसांनी दिली आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांची दखल घेऊन तातडीने डायवर्शन मार्ग दुरुस्त करावा, तसेच स्पष्ट सूचना व दिशादर्शक फलक लावावेत, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

