(संगमेश्वर / एजाज पटेल)
फुणगूस–जाकादेवी मुख्य रस्त्यावरील तीव्र व अवघड वळणावर शनिवारी रात्री भीषण अपघात घडला. गोवा येथून मुंबईकडे प्लास्टिक पेपरची वाहतूक करणारा जी. जे. 03/बी वाय 5664 क्रमांकचा आयषर टेम्पो चालक मो. सिद्दीक मदाकीया हा गुगल मॅपने दर्शविलेल्या जवळच्या मार्गावरून जात असताना रस्त्याचा योग्य अंदाज न आल्याने थेट खोल दरीत पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
हा अपघात शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास झाला. अपघाताची माहिती मिळताच फुणगूसचे पोलीस पाटील प्रशांत थुळ यांनी स्थानिक तरुण व ग्रामस्थांच्या मदतीने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त टेम्पोमधील चालकास सुरक्षित बाहेर काढण्यात आले. अपघातामुळे टेम्पोचे नुकसान झाले आहे.
फुणगूस–जाकादेवी हा मुख्य रस्ता डोंगराळ भागातून जाणारा असून तीव्र चढ-उतार, अरुंद रस्ता व वेडीवाकडी वळणे यामुळे तो अत्यंत धोकादायक ठरतो. विशेषतः बाहेरील भागातून येणाऱ्या व या मार्गाशी अपरिचित असलेल्या चालकांना या रस्त्याचा अंदाज येत नाही. गणपतीपुळे येथे जाण्यासाठी हा मार्ग तुलनेने जवळचा असल्याने या रस्त्यावर अवजड वाहनांसह खासगी वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते.
मात्र या संपूर्ण मार्गावर अनेक ठिकाणी दिशादर्शक फलक, धोक्याच्या सूचना, वेगमर्यादा दर्शविणारी चिन्हे व रिफ्लेक्टरचा अभाव दिसून येतो. परिणामी चालकांना पुढील वळणाची तीव्रता किंवा रस्त्याची दिशा समजत नाही आणि अपघातांची मालिका सुरूच आहे. विशेष म्हणजे याच ठिकाणी यापूर्वीही गुगल मॅपच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवून आलेल्या वाहनांचे अपघात झाल्याच्या घटना घडल्या असून हे वळण आता “अपघातप्रवण क्षेत्र” म्हणून ओळखले जात आहे.
दरम्यान, याच ठिकाणी या अपघाताच्या काही तास आधी आणखी एका वाहनाचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या वळणाची धोकादायक स्थिती पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
या ठिकाणी तीव्र वळणासोबतच खोल दरी असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने लोखंडी संरक्षक कठडे (गार्ड रेलिंग), मोठ्या आकाराचे धोक्याचे फलक व रिफ्लेक्टिव्ह साइन बोर्ड बसवणे अत्यावश्यक आहे. मात्र वारंवार अपघात होऊनही अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही, ही बाब गंभीर आहे. वेळेत उपाय न झाल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
स्थानिक नागरिकांनी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग व वाहतूक प्रशासनाने तातडीने या मार्गाची पाहणी करावी, संरक्षक कठडे व सूचना फलक बसवावेत, तसेच गुगल मॅपसारख्या नेव्हिगेशन अॅप्सवर या मार्गाबाबत स्पष्ट इशारे व सूचना दाखवण्याबाबत कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी केली आहे.

