( संगमेश्वर / प्रतिनिधी )
कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोन्ही जिल्हे शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने अत्यंत आदर्शवत असे आहेत. येथील शिक्षक मुलांमध्ये केवळ दिलेली मूल्येच रुजवतात असं नव्हे तर , या मुलांना आदर्श विद्यार्थी घडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. संगमेश्वर तालुक्यातील सर्व शिक्षक हे कर्तव्यनिष्ठ आहेत, हे येथील शाळा आणि विद्यार्थ्यांची प्रगती पाहिल्यानंतर लक्षात येते असे गौरवोद्गार संगमेश्वर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विजय परीट यांनी काढले.
शांतिलाल मुथा फाउंडेशन तर्फे संगमेश्वर तालुक्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या मूल्यवर्धन प्रशिक्षण कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी विजय परीट यांनी आज विविध ठिकाणी भेटी दिल्या. यावेळी संगमेश्वर बीट मधील संगमेश्वर नंबर दोन या शाळेत आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात शिक्षकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शांतीलाल मुथा फाउंडेशनचे राज्य समन्वयक सुहास पाटील, देवळे बीटचे विस्तार अधिकारी बळवंतराव, प्रशिक्षणाचे तालुका समन्वयक समीर काब्दुले, केंद्रप्रमुख संदेश महाडिक, सोमनाथ सराटे, प्रमोद चिले, प्रमोद मोहिते, राजेंद्र कदम सुलभक लालसाब मुलाणी, हरेश सावंत, शिवप्रसाद गड्डमवार, अपर्णा दायमा आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना विजय परीट पुढे म्हणाली की, संगमेश्वर तालुक्यातील शाळांना भेटी दिल्या असता येथील शाळा पाहून आपले समाधान झाले. गावातील व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी यांच्या जवळ उत्तम समन्वय साधून शिक्षकांनी शाळेसह विद्यार्थ्यांची केलेली प्रगती नक्कीच अभिनंदनीय आहे. या प्रशिक्षणातून शिक्षक जे काही प्राप्त करतील त्याचा उपयोग ते नक्कीच आपल्या शाळेत करू शकतील असा विश्वासही परीट यांनी व्यक्त केला.
देवळे बीटचे विस्तार अधिकारी बळवंतराव यांनी शिक्षकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आम्ही सकाळी दहा वाजता प्रशिक्षण स्थळी उपस्थित झालो. यावेळी आपल्या प्रशिक्षणाचे कामकाज सुरू होते हे पाहून आम्हाला येथील कर्तव्य तत्पर शिक्षकांचा अभिमान वाटला. प्रशिक्षण म्हटले की , काही ठिकाणी आनंदी आनंद असतो. मात्र रत्नागिरी जिल्हा आणि संगमेश्वर तालुका याला अपवाद आहे. संगमेश्वर तालुक्यात सह्याद्रीच्या पायथ्याशी असणारे शिक्षक सह्याद्री सारखेच कणखर आहेत आणि तशाच पद्धतीने विद्यार्थ्यांना ज्ञानी बनवत आहेत तर, खाडीभागातील शिक्षक हे येथील वाहत्या वाऱ्याप्रमाणे ज्ञानाची गंगा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत आहेत. आपण दापोली येथे गटशिक्षणाधिकारी म्हणून काम केले आहे, आता संगमेश्वर तालुक्यात विस्तार अधिकारी म्हणून काम करताना आपण अधिक समाधानी आहोत असे गौरवोद्गार बळवंराव यांनी काढले. आपल्या ओघवत्या शैलीतील मार्गदर्शनाने बळवंतराव यांनी शिक्षकांना आपलंसं केलं.
शांतीलाल मुथा फाउंडेशनचे राज्य समन्वयक सुहास पाटील यांनी शिक्षकांना मार्गदर्शन करताना, मूल्यवर्धन प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात प्रथम बीड येथे सन २००९ साली झाली. या प्रशिक्षणाचा तेथे काय उपयोग झाला, याचा देखील आढावा घेण्यात आला. यानंतरच राज्याचे मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री यांनी हे प्रशिक्षण राज्यात सर्वत्र राबवण्याचा निर्णय घेतला. संगमेश्वर तालुक्यात सुरू असणारे हे प्रशिक्षण खऱ्या अर्थाने मूल्य रुजवणारेच आहे , असे आपल्या निदर्शनास आले असल्याचे पाटील यांनी अभिमानाने नमूद केले. प्रशिक्षणा दरम्यान उपस्थित असणारे अधिकारी, सुलभक आणि प्रशिक्षणार्थी हे सर्व सारखेच असल्याने येथील नियम हे प्रत्येकाने समान पद्धतीनेच पाळायला हवेत असेही पाटील यांनी नमूद केले.
कारभाटले हायस्कूलचे मुख्याध्यापक अत्तारसर यांच्या हस्ते गटशिक्षणाधिकारी विजय परीट यांचा शाल – श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. केंद्रप्रमुख प्रमोद मोहिते यांच्या हस्ते बळवंतराव सरांचा तर, प्रमोद चिले यांच्या हस्ते समीर काब्दुले यांचा सन्मान करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपल्या ओघवत्या शैलीत आणि विविध उदाहरणे देत संदेश महाडिक यांनी उत्तमरीत्या केले.

