(गुहागर)
गुहागर तालुक्यातील ग्रामपंचायत उमराठची सर्वसाधारण ग्रामसभा गुरुवार दि. १८.१२.२०२५ रोजी दुपारी २ वा. श्री नवलाई देवीची सहाण येथे सरपंच जनार्दन आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या ग्रामसभेला पुर्ण गण संख्येनुसार ११६ ग्रामस्थ उपस्थित होते. या ग्रामसभेला पंचायत समितीच्या उपअभियंता (पाणी पुरवठा) धारप मॅडम, शाखा अभियंता (पाणी पुरवठा) मोरे, अभियंता महेश जवरत आणि ठेकेदार चव्हाण उपस्थित होते. सुरुवातीला या सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन सरपंच जनार्दन आंबेकर यांनी स्वागत केल्यानंतर सभेला सुरुवात झाली.
सुरुवातीलाच उमराठ गावांतर्गत अपुर्ण असलेल्या जलजीवन मिशन कामांविषयी चर्चा झाली. धारप मॅडमनी जलजीवनची थांबलेल्या कामांबाबत उद्भवलेल्या अडीअडचणी ग्रामस्थांना समजावून सांगितल्या. ग्रामस्थांनी सुद्धा त्या अडीअडचणी समजून घेतल्या आणि चर्चेअंती लवकरच उर्वरित काम सुरू करावे असे ठरले.
त्यानंतर सभेच्या कामकाजातील मुद्दे ग्रामपंचायत अधिकारी सिद्धेश्वर लेंडवे यांनी मांडून चर्चा करण्यात आली. त्याच बरोबर मुख्यमंत्री पंचायत राज अभियानबाबत गावांर्तगत चालू असलेल्या कामांबाबत आढावा घेण्यात आला. सर्वात शेवटी आयत्या वेळीच्या विषयांवर चर्चा करताना एक महत्त्वाचा अनोखा ठराव सर्वानुमते ग्रामसभेत मंजूर करण्यात आला.
“शाळा व काॅलेजच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास व्हावा म्हणून वाडी-वाडीत घंटा वाजली की, संध्याकाळी ७ ते ९ दोन तास टिव्ही, मोबाईल व रेडिओ बंद ठेऊन पालकांनी मुलांसोबत बसून अभ्यास करून घ्यावा” असा ठराव मांडण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास तर होईलच, त्याच बरोबर पालक व मुले यांचे सद्या दुरावत चाललेले नाते पुन्हा जिव्हाळ्याचे होण्यास मदत होईल, मुलांचे आणि पालकांचे प्रेम व आपुलकी अधिक घट्ट होईल, असे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी समजावून सांगितल्यावर एक व्यापक दृष्टिकोन लक्षात घेऊन चर्चेअंती हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. सदर ठरावाची अमलबजावणी तत्काळ करण्यात यावी असेही ठरले.
सदर ग्रामसभेला उपसरपंच सुरज घाडे, पोलीस पाटील वासंती आंबेकर, माजी तंटामुक्ती अध्यक्ष संदीप गोरिवले, अंगणवाडी सेविका राधा आंबेकर, बचत गटाच्या सीआरपी श्रृती कदम, गावातील वाडी प्रमुख, जेष्ठ ग्रामस्थ शशिकांत पवार, नामदेव पवार, उदय पवार, प्रकाश पवार, शांताराम गोरिवले, भिकू मालप, शांताराम गावणंग, काशिराम गावणंग, उदय गावणंग, नारायण गावणंग, महेश गोरिवले, यशवंत आंबेकर, रामचंद्र आंबेकर, वसंत गावणंग इत्यादी प्रमुख मंडळींसह बहुसंख्य ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती. सदर ग्रामसभा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. ग्रामसभा यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायतचे कर्मचारी नितीन गावणंग, प्रशांत कदम आणि संगणक परिचालक साईस दवंडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

