(चिपळूण)
रामपूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीनंतर दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला. ९ सदस्यांपैकी ५ विरुद्ध ४ अशा मतांनी अमिता अशोक चव्हाण यांची सरपंचपदी निवड झाली. गुप्त मतदानात विरोधी गटातील एक मत फुटल्याचे लक्षात येताच वाद शिगेला पोहोचला. काही वेळासाठी वातावरण तणावपूर्ण झाले होते, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
या निवडणुकीसाठी शुक्रवारी ग्रामपंचायतीमध्ये नायब तहसीलदार मोरे यांच्या अध्यक्षतेखाली प्रक्रिया पार पडली. सरपंचपद हे सर्वसामान्य खुल्या प्रवर्गासाठी राखीव असल्याने दोघांनी उमेदवारी दाखल केली होती. मतदान गुप्त पद्धतीने झाले असून अमिता चव्हाण यांना ५ मते मिळाल्याने त्यांची सरपंचपदी निवड झाली.
निकाल जाहीर होताच ग्रामपंचायत सदस्यांमध्ये वाद झाला. विरोधी गटातील एका सदस्याचे मत फुटल्यामुळे नाराजी व्यक्त होत होती. काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले, मात्र पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेबाबत उशिरापर्यंत चिपळूण पोलिस ठाण्यात कोणतीही अधिकृत नोंद झाली नव्हती.