(पुणे)
पुण्यातील नवले पुलाजवळ आज गुरुवारी संध्याकाळी भीषण अपघात झाला. उतारावरून येणाऱ्या एका कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने तब्बल २० ते २५ वाहनांना चेंडूप्रमाणे उडवत त्यांचा अक्षरशः चुराडा झाला. या भीषण दुर्घटनेत सात जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये कंटेनर चालकाचाही समावेश आहे. पोलिसांच्या माहितीनुसार मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
हा अपघात नवले पुलानंतर पुण्याकडे जाणाऱ्या बोगद्यात झाला. कंटेनर उतारावरून वेगात येत असताना अचानक ब्रेक फेल झाले. नियंत्रण सुटल्याने कंटेनरने समोर येणाऱ्या वाहनांना एकामागोमाग धडक दिली. तब्बल तीन किलोमीटर अंतरापर्यंत कंटेनर इतर वाहनांना धडक देत गेला. नवले पुलावरील हा अपघात इतका भीषण होता की, गाड्यांची एकमेकांना धडक झाल्यानंतर दोन ते तीन वाहनांनी पेट घेतला.
अपघाताच्या भीषणतेमुळे काही गाड्या हवेत उडाल्या, तर काही रस्त्यावर उलटल्या. एका कारचा चक्काचूर होऊन ती दोन कंटेनरच्या मध्ये अडकली. काही क्षणांतच कंटेनरला आग लागली आणि त्याच आगीत ही कार प्रवाशांसह जळून खाक झाली. वाहनातील प्रवासी बाहेर पडू शकले नाहीत; परिणामी, संपूर्ण कार राखेत परिवर्तित झाली. जळालेल्या कारची अवस्था बघून कारमधील प्रवाशांची काय अवस्था झाली असेल या विचारानेच प्रत्यक्षदर्शींच्या अंगावर काटा आला होता. अपघातात कार, रिक्षा, दुचाकी, प्रवासी वाहतूक करणाऱ्या मोठ्या वाहनांचेही नुकसान झाले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सुमारे तासाभराच्या प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणण्यात आली. यानंतर क्रेनच्या सहाय्याने जळालेली वाहने आणि कंटेनर हटविण्याचे काम सुरू करण्यात येत आहे
या भीषण अपघातामुळे मुंबई-बेंगळुरू महामार्गावरील वाहतूक काही तास ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी तात्पुरते वाहतूक वळविण्याची व्यवस्था केली असून अपघाताचा सविस्तर तपास सुरू आहे.

