(संगमेश्वर / प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातील कळकदारा-खाडीकोळवण रस्त्याच्या दुपदरीकरणाच्या कामासाठी वापरण्यात येणारा चार लाख रुपये किमतीचा ब्रेकर चोरीला गेल्याची घटना १२ नोव्हेंबर रोजी घडली होती. या चोरीचा काही दिवसांतच छडा लावत साखरपा पोलिसांनी पुण्यातील सोनसांगवी येथून चोरीचा ब्रेकर हस्तगत केला असून, तो विकत घेणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विकास राय (वय अंदाजे २५) याने भाड्याने पिकअप गाडी घेऊन चार लाख रुपये किमतीचा ब्रेकर पुण्यातील सोनसांगवी येथे नेला आणि त्याची विक्री केली. या प्रकरणी १५ नोव्हेंबर रोजी साखरपा पोलीस दूरक्षेत्रात तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. मोबाईल सीडीआरच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी विकास राय हा मूळगावी बिहार येथे असल्याचे समोर आले.
दरम्यान, चोरीस गेलेला ब्रेकर पोलिसांनी सोनसांगवी, पुणे येथून हस्तगत केला असून, तो विकत घेणारा अरविंद यादव (वय अंदाजे २१) याला ताब्यात घेतले आहे. मुख्य आरोपीचा शोध अद्याप सुरू आहे.
पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शांताराम पंदेरे आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन जाधव या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.


