(संगमेश्वर /रत्नागिरी प्रतिनिधी)
निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत सोपविण्यात आलेली जबाबदारी स्वीकारण्यास टाळाटाळ करणे एका शिक्षकाला चांगलेच महागात पडले आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून नियुक्ती होऊनही कामकाज स्वीकारले नाही, वारंवार सूचना देऊनही निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर नोंदणी केली नाही आणि कारणे दाखवा नोटिशीलाही उत्तर दिले नाही, असा ठपका ठेवत संबंधित शिक्षकाविरोधात देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदेश प्रकाश झेपले असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकाचे नाव आहे.
याप्रकरणी संयोगिता जनार्दन बावणे (वय ४६, व्यवसाय पर्यवेक्षक तथा मंडळ अधिकारी, कोसंब, तहसील कार्यालय संगमेश्वर) यांनी फिर्याद दिली आहे. झेपले हे जिल्हा परिषद शाळा, साडवली सह्याद्रीनगर येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची २८३ साडवली या मतदान केंद्राच्या मतदार यादी भागासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार संगमेश्वर यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली होती. त्यानुसार गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती संगमेश्वर यांच्यामार्फत संबंधित शिक्षकाला नियुक्ती आदेश बजावण्यात आला होता. मात्र, आदेशाची बजावणी होऊनही त्यांनी बीएलओ म्हणून कामकाज स्वीकारले नसल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर आवश्यक नोंदणी करण्याबाबत तहसील कार्यालयाच्या निवडणूक शाखेकडून वारंवार सूचना देण्यात आल्या. संपर्क साधूनही संबंधित शिक्षकाने नोंदणी केली नाही. याशिवाय सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा प्रभारी तहसीलदार यांच्याकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, त्यावरही कोणताही खुलासा सादर करण्यात आला नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने सुरू असताना, नियुक्तीचे कर्तव्य पार पाडण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करून शासकीय कामात कसूर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० च्या कलम ३२ अन्वये संदेश प्रकाश झेपले यांच्याविरोधात देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी २ ते १९ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ या कालावधीत साडवली येथील मतदार यादी भाग क्रमांक २८३ संदर्भात हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे.


