( खेड )
मुंबई–गोवा महामार्गावरील वेरळ गावच्या हद्दीत शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास मोठा अपघात झाला. रिक्षाला वाचवण्याच्या प्रयत्नात चारचाकी टेम्पोचा ताबा सुटून तो महामार्गावरच पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही; मात्र टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
हा अपघात मुंबई–गोवा महामार्गालगत असलेल्या वशिष्ठी डेअरीसमोर घडला. सध्या या ठिकाणी महामार्गाचे काम सुरू असून वाहतूक एकाच लेनवरून सुरू आहे. दुसऱ्या लेनचे काम प्रगतीपथावर असल्यामुळे या मार्गावर वारंवार अडचणी निर्माण होत आहेत.
एकाच लेनवरून वाहतूक सुरू असताना समोरून आलेल्या रिक्षाला वाचवण्याच्या नादात टेम्पो चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि टेम्पो उलटून रस्त्यावर पलटी झाला. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस आणि नरेंद्र महाराज संस्थेची रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली.
घटनास्थळी तपासणी केल्यानंतर कोणालाही दुखापत झालेली नसल्याची खात्री करण्यात आली. त्यानंतर पलटी झालेला टेम्पो बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू करण्यात आले. काही वेळानंतर वाहतूक हळूहळू पूर्ववत झाली. मात्र या घटनेमुळे काही काळ महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

