(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
कोस्टगार्ड विभागाच्या झाडगाव येथील बांधकाम प्रकल्पात काम करण्याचे कंत्राट देऊन प्रत्यक्ष काम करून घेतल्यानंतर सुमारे ८० लाख रुपयांची देय रक्कम थकविल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पुण्यातील ‘अंतरा डिझाईन स्टुडिओ’च्या मालक महिला कंत्राटदाराने दिलेल्या तक्रारीवरून नाशिक येथील मेसर्स प्राड इन्फ्रा कंपनीच्या मालकासह प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प समन्वयक आणि अन्य एका कंत्राटदाराविरोधात रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सी. आश्विनी सुनील आंबेकर (वय ३४, व्यवसाय इंटिरिअर डिझायनर व कंत्राटदार, रा. वारजे, पुणे) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार मेसर्स प्राड इन्फ्रा कंपनीचे मालक दिंगबर आनंदराव पिंगळे, प्रकल्प व्यवस्थापक श्रीधर सुरेंद्र लोंढे, प्रकल्प समन्वयक दिनेश नाडगोंडे आणि कंत्राटदार राजू खेतावत यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २३ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री १०.४७ वाजता गुन्ह्याची नोंद झाली. तक्रारीनुसार, आश्विनी आंबेकर यांची ‘अंतरा डिझाईन स्टुडिओ’ नावाची आर्किटेक्चर, डिझाईन आणि सिव्हिल कॉन्ट्रॅक्टिंग फर्म आहे.
पुण्यात व्यावसायिक कामानिमित्त त्यांची दिनेश नाडगोंडे यांच्याशी ओळख झाली होती. जून २०२६ मध्ये नाडगोंडे यांनी रत्नागिरीतील कोस्टगार्ड विभागाच्या बांधकाम प्रकल्पात लेबर कॉन्ट्रॅक्टवर काम घेण्याची संधी असल्याचे सांगितले. कामाचे पैसे दर १५ दिवसांनी मिळतील, अशी हमीही दिली. त्यावर विश्वास ठेवून आंबेकर यांनी पती आणि व्यावसायिक मित्रासह झाडगाव येथील कोस्टगार्डच्या मॅरिड अॅकॉमोडेशन प्रकल्पाची पाहणी केली. यानंतर २७ जून २०२६ रोजी एस प्लस ०७ आणि एस प्लस ०८ या इमारतींच्या फिनिशिंग वर्कसाठी वर्क ऑर्डर देण्यात आली. त्यामध्ये पेंटिंग, दरवाजे, खिडक्या, इलेक्ट्रिकल कामे तसेच टाइल्स बसविण्याच्या कामांचा समावेश होता. पुढे ५ ऑगस्ट २०२६ रोजी प्राड इन्फ्रा कंपनीचे मालक दिंगबर पिंगळे यांच्यासोबत लेखी करार करण्यात आला. कामाची रनिंग बिले दर १५ दिवसांनी अदा करण्याचे त्यात ठरल्याचे तक्रारीत नमूद आहे.
करारानुसार आंबेकर यांच्या फर्मने एस प्लस ०७ इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यापर्यंत टाइल्सचे काम, पाचव्या मजल्यापर्यंत इलेक्ट्रिकल काम, सातव्या मजल्यापर्यंत अंतर्गत प्लंबिंगचे काम तसेच दोन्ही बाजूंच्या जिन्यांचे ग्रॅनाइटचे काम पूर्ण केले. मात्र, करारात ठरल्याप्रमाणे पंधरा दिवसांनी देय असलेली बिले मिळाली नाहीत. त्यामुळे ८ ऑक्टोबर रोजी करार रद्द करून अंतिम बिलाची मागणी करण्यात आली.
साहित्याचा खर्च, मजुरांची देणी, दहा टक्के सुपरव्हिजन चार्जेस आणि १८ टक्के जीएसटी यांचा समावेश करून ५५ लाख १२ हजार ५०५ रुपयांचे बिल निश्चित करण्यात आले. हे बिल १६ ऑक्टोबर रोजी कंपनीच्या अधिकृत ई-मेलवर पाठविण्यात आले; मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही, असे तक्रारीत म्हटले आहे. याच प्रकल्पांतर्गत कोस्टगार्डच्या मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस ओटीएम गॅरेजमधील आरसीसी स्लॅबचे कामही आंबेकर यांच्या फर्मला देण्यात आले होते. सुरुवातीला ६५०० चौरस फुटांच्या कामासाठी ११ लाख ५० हजार रुपयांची वर्क ऑर्डर देण्यात आली होती. प्रत्यक्ष कामाची पाहणी केल्यानंतर कामाच्या स्वरूपातील तफावत लक्षात आणून देत दर सुधारण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार १८ जुलै रोजी २५० रुपये प्रति चौरस फूट दराने सुधारित वर्क ऑर्डर देण्यात आली. या कामासाठी आंबेकर यांनी १० जुलैपासून भाडेतत्त्वावर सेंटरींगचे साहित्य, प्लेट्स, प्रॉप्स, एच फ्रेम आणि स्वतःचे प्लायवूड साहित्य आणून कामाची तयारी केली. मात्र, करारानुसार प्राड इन्फ्रा कंपनीकडून स्लॅबचे स्टील आणि रेडीमिक्स काँक्रिट (आरएमसी) उपलब्ध करून देण्यात आले नाही.
परिणामी, साहित्य चार महिने साईटवर अडकून पडल्याने त्याचे भाडे भरावे लागत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. १८ ऑक्टोबर रोजी प्राड इन्फ्रा कंपनीचे मालक, प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प समन्वयक आणि अन्य कंत्राटदार पुण्यातील आंबेकर यांच्या कार्यालयात गेले होते. त्यावेळी देय रकमेबाबत चर्चा झाली. त्यानंतर २० ऑक्टोबर रोजी स्लॅबच्या कामाचे १६ लाख २५ हजार रुपये, प्रॉप्सचे भाडे १ लाख ८६ हजार ९१२ रुपये, प्लेटचे भाडे १ लाख २० हजार रुपये, कामगारांचे चार आठवड्यांचे वेतन १ लाख १० हजार रुपये आणि सुपरव्हिजन चार्जेस ८१ हजार २५० रुपये, अशी जीएसटीसह एकूण २५ लाख ५ हजार ३३१ रुपयांची रकमेची मागणी करण्यात आली. हे बिल संबंधितांच्या व्हॉट्सॲपवर पाठवूनही पैसे मिळाले नसल्याचा आरोप आहे. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला असून, कंत्राटी व्यवहार, प्रत्यक्ष केलेले काम, देय बिले आणि दुसऱ्या कंत्राटदाराला दिलेल्या कामासंदर्भातील आरोपांची पुढील तपासात पडताळणी होणार आहे.
चालू करार असतानाच दुसऱ्या कंत्राटदाराला काम?
या प्रकरणाला आणखी एक महत्त्वाची किनार असल्याचे तक्रारीत नमूद आहे. एस प्लस ०७ आणि एस प्लस ०८ इमारतींच्या फिनिशिंग वर्कसाठी अंतरा डिझाईन स्टुडिओसोबत झालेला करार रद्द होण्यापूर्वीच प्राड इन्फ्रा कंपनीने राजू खेतावत यांच्या ‘श्रुती असोसिएट्स’सोबत नव्याने करार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यापूर्वीच्या कंत्राटदाराची येणी, सुरू असलेले काम आणि त्यांच्यातील वाद यांची माहिती असतानाही कोणतीही एनओसी न घेता हा करार करण्यात आल्याचे आंबेकर यांनी तक्रारीत म्हटले आहे. फिनिशिंग वर्कचे ५५ लाख १२ हजार ५०५ रुपये आणि आरसीसी स्लॅबच्या कामाचे २५ लाख ५ हजार ३३१ रुपये, अशी एकूण ८० लाख १७ हजार ८३६ रुपयांची देय रक्कम थकवून आपली आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे.


