(पुणे)
गोवा राज्यात निर्मित आणि महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या विदेशी मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणारा सहा चाकी ट्रक राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे. गुरुवारी (दि. १७ डिसेंबर) साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने हा ट्रक येत असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सासवड विभागाला मिळाली होती.
या माहितीच्या आधारे उत्पादन शुल्क विभागाने पुणे–सातारा महामार्गावरील सारोळे (ता. भोर) येथे सापळा रचत संबंधित ट्रक ताब्यात घेतला. ट्रकचालकाची कसून चौकशी केली असता, हा मद्यसाठा पुणे जिल्ह्यातील आंबेगाव बुद्रुक (ता. हवेली) येथे पोहोचविण्यात येणार असल्याची माहिती उघड झाली.
त्यानंतर कोणालाही संशय न येऊ देता उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ट्रक आंबेगाव बुद्रुक येथे नेला. तेथे मद्यसाठा स्वीकारण्यासाठी आलेली स्कॉर्पिओ वाहन आढळून आली. पुढील कारवाईत संबंधित आरोपीच्या राहत्या घरातूनही अतिरिक्त विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला.

या संपूर्ण कारवाईत सहा चाकी ट्रक, स्कॉर्पिओ वाहन तसेच मोठ्या प्रमाणात विदेशी मद्य असा एकूण ४३ लाख ५७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांना शुक्रवारी भोर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
ही यशस्वी कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक एस. एस. बरगे, दुय्यम निरीक्षक एस. सी. शिंदे, पी. एम. मोहिते, जवान डी. के. पिलावरे, पी. आर. सुर्यवंशी, महिला जवान मनिषा भोसले, जवान अंकुश कांबळे व मोहन गवळी यांच्या पथकाने केली.

