(संगमेश्वर)
शृंगारपूर येथील म्हस्केवाडी परिसरात शुक्रवारी दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास दिवसा ढवळ्या एका बिबट्याने घरात प्रवेश केल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. श्री. सदाभाऊ म्हस्के यांच्या घराच्या पारड्यात बिबट्या वावरत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी त्याने एका कोंबडीवर झडप घालून तिला नेण्याचा प्रयत्न केला.
ही घटना पाहताच सौ. जयश्री म्हस्के यांनी आरडाओरड केल्यानंतर बिबट्या काही काळ दबा धरून लपून बसला. काही वेळाने तो पुन्हा बाहेर येत बिनधास्त वावरू लागला. गावकऱ्यांनी आरडाओरड केल्यानंतर बिबट्या महादेव सुर्वे यांच्या घरात शिरला. या घटनेची माहिती श्री. वामन म्हस्के व विमलाकांत पवार यांनी ग्रामस्थांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर सरपंच श्री. विनोद पवार यांनी तत्काळ वनविभागाला घटनेची माहिती दिली.
माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावून मोहीम सुरू करण्यात आली. राजा म्हस्के यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी बिबट्याला जेरबंद करण्याच्या कार्यात सहकार्य केले. अखेर सायंकाळी सुमारे पावणे नऊच्या सुमारास वनविभागाला बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश आले. बिबट्या पकडण्यात आल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

