(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहराच्या हद्दीत बिबट्याचा वावर पुन्हा एकदा चर्चेत आला असून, विश्वनगर परिसरात घडलेल्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. गुरुवारी (दि. १९) रात्री साडे आठच्या सुमारास नगरपरिषद वसाहत, विश्वनगर येथील अमोल सावंत यांच्या आंब्याच्या बागेत बिबट्याने एका बैलावर हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून नागरिक सतर्क झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने दखल घेतली. थिबा पॅलेस, विश्वनगर आणि आंबेशेत परिसरातील नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे. विशेषतः सकाळी मॉर्निंग वॉकसाठी एकट्याने बाहेर पडू नये, तसेच रात्रीच्या वेळी अनावश्यक फिरणे टाळावे, असे पोलिस अधीक्षक यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, बिबट्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नयेत आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. वन विभागाकडून परिस्थितीवर नजर ठेवली जात असून आवश्यक त्या उपाययोजना राबवण्यात येत आहेत.
या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी नागरिकांना शांत राहण्याचे आणि काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. बिबट्या हा वन्य प्राणी असून तो सहसा माणसांपासून दूर राहतो; मात्र अन्नाच्या शोधात किंवा भीतीपोटी तो मानवी वस्तीत शिरू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. अशा वेळी घाईगडबड न करता काही सोप्या पण महत्त्वाच्या खबरदारी घेतल्यास संभाव्य धोका टाळता येऊ शकतो, असेही त्यांनी नमूद केले.
रात्री सहा-सात वाजल्यानंतर लहान मुलांना एकटे बाहेर सोडू नये. घराबाहेर कचरा, उरलेले अन्न, मांसाहारी पदार्थ किंवा पाळीव प्राण्यांचे अन्न उघड्यावर ठेवू नये, कारण त्यामुळे बिबट्याला आकर्षण निर्माण होऊ शकते. कुत्र्यांना रात्री मोकळे सोडू नये, कारण बिबट्या प्रामुख्याने कुत्र्यांवर हल्ला करतो. घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत पिल्ले व कोंबड्या ठेवताना विशेष खबरदारी घ्यावी, रात्री त्यांना आत घ्यावे किंवा मजबूत जाळीचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
बिबट्या दिसल्यास घाबरून जाऊ नये. शांतपणे मागे सरकत सुरक्षित ठिकाणी जावे, डोळ्यात डोळे घालू नयेत, तसेच स्वतः मोठे दिसण्यासाठी हात वर करून सावकाश हालचाल करावी. हल्ल्याची घटना घडल्यास तातडीने १०० किंवा ११२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बिबट्याला मारण्याचा किंवा हुसकावण्याचा प्रयत्न करू नये. तो घाबरल्यास अधिक धोकादायक ठरू शकतो. अशा वेळी वन विभागाला कळवणे हाच सर्वात सुरक्षित मार्ग असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी सजग राहून एकमेकांना सतर्क करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.

