(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी येथे पार पडलेल्या शालेय तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत जिंदल विद्या मंदिर प्रशालेच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत मोठे यश संपादन केले आहे.
१४ वर्षाखालील मुलांच्या गटात श्रवण केदारी याने १०० मीटर धावण्यामध्ये द्वितीय क्रमांक, तर गौरांग हळदणकर याने १०० मीटर धावण्यात तृतीय क्रमांक मिळवला. तसेच ४x१०० मीटर रिलेमध्ये श्रवण केदारी, गौरांग हळदणकर, अनय मोरे, सुमेध सावंत आणि देवदर्श वेळंडी यांनी उत्कृष्ट संघभावनेच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावला. १७ वर्षाखालील गटात यशवर्धन मोहिते याने ८०० मीटर धावण्यामध्ये तृतीय क्रमांक मिळवून आपले कौशल्य दाखवले.
या सर्व यशस्वी खेळाडूंची निवड १० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. या विजयी खेळाडूंचे शाळेचे पर्यवेक्षक दीपक दरडी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय इंगवले आणि शिक्षकवृंदांनी अभिनंदन केले. या खेळाडूंना शाळेचे क्रीडाशिक्षक रणजित जाधव यांच्यासह मिथिला मोरे आणि विनोद पिल्ले यांचे मार्गदर्शन लाभले.

