(संगमेश्वर / एजाज पटेल)
फुणगूस खाडीपट्ट्यातील सुमारे तीस ते पस्तीस गावांचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या फुणगूस येथे आजतागायत प्रवाशांसाठी साधी निवारा शेडही उभारली गेलेली नाही. ही बाब आता केवळ गैरसोयीपुरती मर्यादित न राहता जनतेच्या संतापाचा विषय ठरली आहे. खासगी वाहने आणि एसटी बसेसची सातत्याने ये-जा, तसेच आजूबाजूच्या गावांतील नागरिकांची एसटी बस पकडण्यासाठी होणारी दररोजची गर्दी लक्षात घेता, फुणगूस हे परिसरातील अत्यंत महत्त्वाचे प्रवास केंद्र आहे. मात्र, वर्षानुवर्षांच्या प्रशासनिक उदासीनतेमुळे प्रवाशांना पावसात भिजत आणि उन्हात होरपळत उभे राहावे लागत असल्याचे विदारक चित्र येथे दिसून येते.
फुणगूस येथे बँक, प्राथमिक आरोग्य केंद्र, विविध शासकीय कार्यालये असल्याने दिवसभर नागरिकांची मोठी वर्दळ असते. शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच रुग्ण अशा सर्वच स्तरांतील लोकांना येथे थांबावे लागते. परंतु निवारा शेड नसल्याने पावसाळ्यात झाडांचा आधार किंवा उन्हाळ्यात दुकानांच्या पडव्या हाच एकमेव पर्याय प्रवाशांसमोर उरतो. ही परिस्थिती केवळ असुविधाजनकच नव्हे, तर प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.
स्थानिक नागरिक संतप्तपणे विचारत आहेत की, “फुणगूस हे खाडिभागातील नाक्यावरचे गाव असून येथे रोज शेकडो नागरिकांची ये-जा असते. मग इतक्या वर्षांत एक साधा निवारा शेडही उभारला जाऊ नये, ही प्रशासनाची अपयशाची कबुली नाही का?” विशेष म्हणजे, या निवारा शेडची जबाबदारी नेमकी कोणाची — ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद की एसटी महामंडळ? याबाबत कोणतीही स्पष्टता नसल्याने संबंधित यंत्रणा एकमेकांकडे बोट दाखवत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. याचा फटका मात्र दररोज प्रवाशी जनतेलाच बसत आहे.
स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांच्या मते, “याबाबत अनेकदा तोंडी मागणी करण्यात आली; मात्र फाईल कुठे अडकली, याचा आजतागायत उलगडा झालेला नाही. निवारा शेडसारखी मूलभूत सुविधा देण्यातही जर प्रशासन अपयशी ठरत असेल, तर ग्रामीण विकासाच्या घोषणा केवळ कागदोपत्री आणि दिखाव्यापुरत्याच उरतात,” अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
पावसाळ्यात ही समस्या अधिकच गंभीर बनते. लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना अक्षरशः उजाड रस्त्यावर उभे राहून बसची वाट पाहावी लागते. उन्हाळ्यात तीव्र उष्णतेमुळे त्रास सहन करावा लागतो, तर अपघात किंवा आरोग्याच्या तक्रारींची शक्यता नाकारता येत नाही.
आता येथील जनतेची ठाम मागणी आहे की, फुणगूस येथे तातडीने निवारा शेड उभारण्यात यावी, त्यासाठी आवश्यक निधी मंजूर करून कामाला त्वरित सुरुवात करावी आणि यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन ही मूलभूत गरज पूर्ण करावी. अन्यथा, प्रशासनाविरोधातील आमचा रोष आणखी तीव्र केला जाईल, असा इशारा दिला आहे.

