(खेड)
खेड–मंडणगड मार्गावर आज (गुरुवारी) दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास एसटी बस आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. भिलारे–आयनी गावाजवळ हा दुर्दैवी अपघात घडला असून, घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या अपघातात आयनी–चव्हाणवाडी येथील रहिवासी विलास कोरपे यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, विलास कोरपे हे खेड येथून आपल्या दुचाकीने आयनी गावाकडे जात होते. त्याच वेळी मंडणगडहून खेडच्या दिशेने येणाऱ्या एसटी बसची आणि त्यांच्या दुचाकीची भिलारे–आयनी गावानजीक समोरासमोर जोरदार धडक झाली.
धडक इतकी तीव्र होती की दुचाकी पूर्णपणे चक्काचूर झाली असून एसटी बसचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या भीषण अपघातात विलास कोरपे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या निधनामुळे कुटुंबीयांवर तसेच आयनी गावावर शोककळा पसरली आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्वामी नरेंद्र महाराज संस्थेची रुग्णवाहिका आणि स्थानिक नागरिक मदतीसाठी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत विलास कोरपे यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते. या अपघातामुळे काही काळ खेड–मंडणगड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
खेड–मंडणगड मार्ग हा वळणावळणाचा व अरुंद असल्याने येथे वारंवार अपघात होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे व वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. तसेच या मार्गावर अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

