(खेड)
मुंबई-गोवा महामार्गावरील वेरळजवळ पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे ६० हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. तसेच गुटखा वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला चार लाख रुपयांचा टेम्पोही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खेडच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या ‘बडा योद्धा अशोक लेलैंड’ टेम्पोला वेरळ रेल्वे स्टेशन रस्त्याजवळ पोलिसांनी थांबण्याचा इशारा दिला. मात्र, चालकाने थांबण्याऐवजी टेम्पो अधिक वेगात पळवण्याचा प्रयत्न केला. यावेळी कर्तव्यावर असलेल्या उपनिरीक्षक येवले यांनी तत्काळ टेम्पोचा पाठलाग करत काही अंतरावर त्याला अडवले. टेम्पोची झडती घेतली असता त्यामध्ये तब्बल १४ पोत्यांमध्ये ३०८ गुटख्याच्या पॅकेट्स आढळून आले. या गुटख्याची एकूण किंमत ६०,९८४ रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस निरीक्षक नितीन भोयर व उपनिरीक्षक येवले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईत प्रतिबंधित गुटखा वाहतूक करणारा २१ वर्षीय अविनाश पारेकर (रा. बेवनूर) याला अटक करण्यात आली आहे. याप्रसंगी पोलीस कर्मचारी तुषार झेंडे, प्रशांत माळी व हवालदार ठाकूर यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पोलिसांनी जप्त केलेला गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरलेला वाहन असा एकूण ४ लाख ६० हजार ९८४ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला असून, या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.