(देवळे / प्रकाश चाळके)
शेती म्हणजे केवळ उत्पादन नव्हे, तर मातीशी नाते, शेतकऱ्यांचा सन्मान आणि शाश्वत भवितव्याची उभारणी असते. या मूल्यांना प्रत्यक्षात उतरवणारे तामिळनाडूतील शेतकऱ्यांचे मार्गदर्शक, पोनुस नॅचरल प्रॉडक्ट्सचे संस्थापक आणि शेतीतील ‘ऋषितुल्य’ व्यक्तिमत्त्व श्री. पोन्नुसामी हे देवनगरी देवरुख येथे संगमेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येत आहेत.
सदर मार्गदर्शन दिनांक : 23 डिसेंबर 2025 रोजी, सकाळी 10 ते 2 या वेळेत पंचायत समिती देवरुख, छत्रपती संभाजी महाराज सभागृह येथे केले जाणार आहे. या विशेष व्याख्यानाचे आयोजन संगमेश्वर तालुका ऍग्रोस्टार फार्मफ्रेश शेतकरी उत्पादक कंपनी (FPO) यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे.
अनुभव, संशोधन आणि शाश्वततेचा त्रिवेणी संगम
तामिळनाडूमध्ये हजारो शेतकऱ्यांच्या आयुष्यात आमूलाग्र परिवर्तन घडवणारे श्री. पोन्नुसामी कमी खर्चात अधिक उत्पादन, मातीचे आरोग्य, सेंद्रिय व शाश्वत शेती यांसारख्या विषयांवर प्रत्यक्ष अनुभवाधारित मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या नाविन्यपूर्ण प्रयोगांनी पारंपरिक शेतीच्या चौकटी मोडून शेतकऱ्यांना नवे, व्यवहार्य मार्ग आजवर दाखवले आहेत.
भाषेची अडचण नाही; थेट मराठीत भाषांतर
श्री. पोन्नुसामी यांचे मूळ भाषण तामिळ भाषेत होणार असून, त्याचे सुस्पष्ट व प्रभावी मराठी रूपांतर मूळचे तामिळनाडूचे आणि गेली २५ वर्षे देवरुखचे रहिवासी, प्रथितयश व्यापारी श्री. चेन्नपंडियन देवर शेठ करणार आहेत. त्यामुळे संगमेश्वर तालुक्यातील प्रत्येक शेतकरी या ज्ञानाचा मनापासून लाभ घेऊ शकेल.
शेतकऱ्यांसाठी दुर्मीळ व ऐतिहासिक संधी
तामिळनाडूतील शेतीतील यशस्वी अनुभव, संशोधन आणि प्रयोग थेट कोकणातील शेतकऱ्यांसमोर येण्याची ही दुर्मीळ संधी आहे.
माती कशी जिवंत ठेवायची, खर्च कसा कमी करायचा, उत्पादन कसे वाढवायचे आणि शेतीतून शाश्वत नफा कसा मिळवायचा, या सर्व प्रश्नांची उत्तरे एका सखोल व्याख्यानातून मिळणार आहेत.
संगमेश्वर तालुक्यासह परिसरातील शेतकरी, बागायतदार आणि कृषी क्षेत्रातील जाणकारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा व तामिळनाडूतील शेतीतील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाचे ज्ञान आत्मसात करावे, असे आवाहन संगमेश्वर तालुका ऍग्रोस्टार फार्मफ्रेश प्रोड्युसर कंपनी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

