(नवी दिल्ली)
जगप्रसिद्ध आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे महान शिल्पकार राम सुतार यांचे आज पहाटे दिल्लीत निधन झाले. वयाच्या 101 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने भारतीय शिल्पकलेच्या इतिहासातील एक सुवर्णपान कायमचे बंद झाले आहे. आज सकाळी 11 वाजता गुरुग्राम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
राम सुतार यांना शिल्पकलेतील “चालता-बोलता इतिहास” म्हणून ओळखले जात होते. त्यांनी केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात 200 हून अधिक भव्य शिल्पांची निर्मिती केली. सुमारे 60 वर्षांच्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी शिल्पकलेला जागतिक स्तरावर नवे आयाम दिले.
स्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार
राम सुतार यांचे सर्वात मोठे आणि ऐतिहासिक योगदान म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी. सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा त्यांच्या कलाकौशल्याचा सर्वोच्च नमुना आहे. याशिवाय त्यांनी जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांचे अनेक पुतळे भारतात व परदेशात साकारले.
संसद भवन ते परदेशातील गांधी पुतळे
दिल्लीतील संसद भवनाच्या प्रांगणात राम सुतार यांची अनेक शिल्पे उभी आहेत. तसेच इंग्लंड, इटली, फ्रान्स, रशिया यांसारख्या देशांत त्यांनी उभारलेले महात्मा गांधींचे पुतळे आजही भारताच्या सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक मानले जातात.
धुळ्याच्या गोंदूर गावातून जागतिक कीर्तीपर्यंतचा प्रवास
राम सुतार यांचा जन्म 1925 मध्ये धुळे जिल्ह्यातील गोंदूर गावात झाला. अतिशय गरीब कुटुंबात त्यांचे बालपण गेले. गुरुजी श्रीराम जोशी यांच्या मार्गदर्शनामुळे त्यांनी मुंबईच्या सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट येथे शिक्षण घेतले. 1950 मध्ये त्यांनी अजिंठा लेण्यांच्या पुनर्जतनाचे काम केले. मात्र शिल्पकलेच्या ओढीमुळे त्यांनी सरकारी नोकरी सोडून स्वतंत्र शिल्पकार म्हणून वाटचाल सुरू केली.
राम सुतार यांना त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी पद्मश्री, महाराष्ट्र भूषण यांसारख्या मानाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनीही त्यांच्या शिल्पकलेचे विशेष कौतुक केले होते.
महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावातून निघालेला हा कलाकार जागतिक स्तरावर भारताची ओळख निर्माण करणारा महान शिल्पकार ठरला. त्यांच्या निधनाने कला क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

